Omicron Variant : जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटने (Omicron Variant) कहर माजवला आहे. जगातील 77 देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंट प्रसार झाला आहे. त्यामुळे सर्वच देशांमध्ये सतर्कतेचे आदेश जारी करण्यात आले आहेत. कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरियंट हा इतर कोरोनाच्या प्रकारापेक्षा अधिक धोकादायक असून वेगाने पसरणारा असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO)ने म्हटले आहे.


ओमायक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या धोक्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञ संशोधनावर भर देत लक्षणे आणि उपाय शोधण्यासाठी परिश्रम घेत आहेत. एका संशोधनात ओमायक्रॉन व्हेरियंटच्या लक्षणांबाबत अभ्यास करण्यात आला. ओमायक्रॉन व्हेरियंट सध्या उपलब्ध कोरोना लसींना अत्यंत प्रतिरोधक आहे. उपलब्ध असलेल्या कोविडपैकी कोणतीही लस ओमायक्रॉन व्हेरियंटवर पूर्णपणे प्रभावी नाही. आतापर्यंतच्या परिणामांवरून असे दिसून आले आहे की कोरोनाच्या सुरुवातीच्या प्रकारांच्या तुलनेत या नवीन प्रकारामध्ये लक्षणे कमी गंभीर असल्याचे आढळून आले आहे. मात्र सर्व ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांमध्ये घसा खवखवणे हे समान लक्षण आढळून आले आहे.


दक्षिण आफ्रिकेमधील (South Africa) डिस्कव्हरी हेल्थ संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रायन नॉच यांनी सांगितले की, ''ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांमध्ये आढळलेली काही लक्षणे इतर व्हेरियंटपेक्षा वेगळी असल्याचे समोर आले आहे. यामध्ये घसा खवखवणे हे एक लक्षण समान असल्याचे डॉ. नॉच यांनी म्हटले आहे. यासह नाक कोंदणे, कोरडा खोकला आणि पाठ दुखणे ही लक्षणेही आढळली आहेत.'' डॉ. रायन नॉच यांनी पुढे सांगितले की, ''यापैकी बहुतेक लक्षणे सौम्य आहेत. परंतु याचा अर्थ असा नाही की ओमायक्रॉन कमी धोकादायक आहे असा नाही.'' 


महाराष्ट्रात शुक्रवारी ओमायक्रॉनच्या आठ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 40 वर पोहोचली आहे.  देशातील सर्वाधिक ओमायक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे, यामधील 25 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. देशातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 109 वर पोहचली आहे.  


ओमायक्रॉन व्हेरियंटचा जगात पहिला बळी
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांनी युकेमध्ये ओमायक्रॉन या व्हेरियंटची लागण होऊन किमान एका रुग्णाचा जीव गेल्याची माहिती दिली आहे. या माहितीमुळे ओमायक्रॉन व्हेरियंटही जीवघेणा असल्याचे समोर आल्याने जगभरातील नागरिकांची चिंता वाढली आहे.


महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha