Omicron variant : गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या (coronavirus) संकटाची चिंता सतावत असतानाच आता कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटने (omicron variant) आणखी चिंतेत भर घातली आहे. परंतु, आता ओमिक्रॉन व्हेरियंटबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि कोरोनाव्हायरसचा अभ्यास करणाऱ्या तज्ञांच्या मते ओमिक्रॉनचा व्हेरियंट जास्त तीव्रतेचा नाही. ओमिक्रॉन व्हेरियंटचा पहिला रूग्ण सापडलेल्या दक्षिण आफ्रिकेत गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या दरात घसरण झाली आहे. 


डब्ल्यूएचओने आज सकाळी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेतील काही अहवालांवरून ओमिक्रॉन व्हेरियंट हा डेल्टापेक्षा जास्त प्राणघातक नाही. ओमिक्रॉनमुळे आफ्रिकेत आतापर्यंत एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध मागे घेण्यास हरकत नसल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. 


 दक्षिण आफ्रिकेतील रुग्णालये आणि डॉक्टरांच्या मते, ओमिक्रॉनच्या रूग्णांना तीव्र डोकेदुखी, मळमळ, चक्कर येणे अशी लक्षणे दिसत आहेत. परंतु, ही लक्षणे गंभीर नसून ती अतिशय सौम्य आहेत. दरम्यान, ओमिक्रॉन व्हेरियंटच्या बातम्यांमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच यूके, यूएस, ईयू, इस्रायल, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांनी दक्षिण आफ्रिकन राष्ट्रांतून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घातले आहेत.  
 
दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. अँजेलिक कोएत्झी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमिक्रॉन व्हेरियंट हा जास्त धोकादायक नसून त्याची तक्षणेही तीव्र नाहीत. परंतु, काही देशांनी विनाकारण अपप्रचार करून भीती निर्माण केली आहे. त्यामुळे ओमिक्रॉन व्हेरियंटला घाबरण्याचे कारण नाही. 
 
दक्षिण आफ्रिकेचे आरोग्य मंत्री जो फाहला यांनी देखील सांगितले की, आमच्याकडील डॉक्टरांच्या पाहण्यात आलेल्या रूग्णांमध्ये आढलेली लक्षणे जास्त गंभीर नाहीत. अद्याप गंभीर लक्षणांचा रूग्ण डॉक्टरांच्या पाहण्यात आला नाही. 


दक्षिण आफ्रिकन राष्ट्रांच्या प्रवासावर निर्बंध नको!   
नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटच्या भीतीने दक्षिण आफ्रिकन राष्ट्रांतून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घातले आहेत. परंतु, डब्ल्यूएचओने आव्हान केले आहे की, ओमिक्रॉनची तीव्रता जास्त नसल्याने क्षिण आफ्रिकन राष्ट्रांच्या प्रवासावर निर्बंध घालू नये. डब्लूएचओच्या युरोपमधील प्रादेशिक कार्यालयातील वरिष्ठ आपत्कालीन अधिकारी डॉ. कॅथरीन स्मॉलवूड म्हणाले की, “आफ्रिकन राष्ट्रांतून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घालणे योग्य नाही. डब्ल्यूएचओने अशा प्रकारचे निर्बंध घालण्यासाठी कोणत्याही प्रकारची नियमावली जाहीर केलेली नाही.”



संबंधित बातम्या : 


Dr. Angelique Coetzee On Omicron: ओमिक्रॉन संक्रमित रुग्णांमधील ऑक्सिजनची पातळी कमी होते? वाचा काय म्हणाल्या डॉ. अँजेलिक कोएत्झी



Omicron China Connection: ओमिक्रॉनचे चीन कनेक्शन आहे तरी काय? WHO ने व्हेरियंटचे नाव हेच का ठेवले?