अमेरिकेत ओमायक्रॉन बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. या दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. अमेरिका प्रशासन ओमायक्रॉनच्या संसर्गाशी दोन हात करण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी सांगितले. अमेरिकेत ओमायक्रॉनच्या संसर्गाशी दोन हात करण्यासाठी त्यांनी सरकारने उचललेल्या पावलांची माहिती दिली. 


ओमायक्रॉनबाबत गांभीर्य हवे, घाबरू नका


बायडन यांनी म्हटले की,  आपण सर्वांनी ओमायक्रॉन व्हेरियंटबाबत गांभीर्य हवे मात्र घाबरण्याची गरज नाही. त्यांनी पुढे म्हटले की,  हा 2020 मधील मार्च महिना नाही. अमेरिकेत आता सुमारे 20 कोटी लोकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. आपल्याला संसर्गाचा फैलाव कसा रोखायचा आहे, यावर लक्ष द्यायचे आहे. देशातील लसीकरणामुळे 62 टक्के लोकसंख्येमधील गंभीर संसर्ग रोखण्यास मदत मिळणार आहे. 


टीका न घेतलेल्या लोकांना सल्ला


कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्यांनी देशाप्रति असलेले कर्तव्य, देशप्रेमाच्या भावनेतून लस घ्यावी असे आवाहन राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी केले. ओमायक्रॉनपासून आणखी सुरक्षित राहण्यासाठी लसीकरण झालेल्यांनी बुस्टर डोस घ्यावा असेही त्यांनी म्हटले. देशातील वैद्यकीय उपकरणांचा साठा वाढवला जात आहे. शाळा बंद न करता, कोणत्याही प्रकारचा लॉकडाउन न करता या व्हेरियंटला रोखता येऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 


बायडन प्रशासनाची योजना काय?


राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी प्रशासनाने आखलेल्या उपाययोजनेची माहिती दिली.  यामध्ये लष्कराच्या जवानांना मदतीसाठी रुग्णालयात तैनात करणे, नवीन मोफत कोरोना चाचणी केंद्र सुरू करणे, कोरोनाने अधिक प्रभावित असलेल्या राज्यांना मदत पुरवठा सुरू ठेवणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे. अमेरिकन सरकार आवश्यकतेनुसार जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात 1000 डॉक्टर, परिचारिका आणि लष्करी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देशभरातील रुग्णालयात तैनात करणार आहे. मिशिगन, इंडियाना, विस्कॉन्सिन, ऍरिझोना, न्यू हॅम्पशायर आणि व्हरमाँट राज्यांमध्ये अतिरिक्त आपत्कालीन मदत पथक पाठवण्यात येणार आहे. त्याशिवाय, देशांतर्गत कोरोना चाचणीवर भर दिला जात आहे.