Omicron variant : कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटने जगभरात थैमान घातले होते. त्यानंतर आता ओमायक्रॉनचा (omicron) व्हेरियंट फैलावत आहे. ओमायक्रॉनच्या व्हेरियंटची धास्ती अनेक देशांनी घेतली असून खबरदारीच्या उपाययोजना आखल्या जात आहे. डेल्टापेक्षा ओमायक्रॉन धोकादायक आहे का? याबाबत चर्चा सुरू आहे. तर, दुसरीकडे अमेरिकन सरकारचे वैद्यकीय सल्लागार, ज्येष्ठ संसर्गरोग तज्ज्ञ डॉ. अँथोनी फाउची यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. ओमायक्रॉनची गंभीरता लक्षात येण्यासाठी आणखी काही दिवस लागतील असे त्यांनी म्हटले. 


एका मुलाखतीत डॉ. फाउची यांनी ओमायक्रॉन व्हेरियंटबाबत भाष्य केले आहे. त्यांनी म्हटले की, ओमायक्रॉन किती गंभीर असू शकतो, हे समोर येण्यास काही दिवसांचा अवधी लागणार आहे. मात्र, प्राथमिकदृष्ट्या मिळालेली माहिती, संशोधनानुसार हा व्हेरियंट डेल्टाच्या तुलनेत कमी हानीकारक असल्याचे संकेत मिळत आहेत. 


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार असलेल्या डॉ. फाउची यांनी सांगितले की, ओमायक्रॉनला दक्षिण आफ्रिकेत फैलावण्यासाठी काही आठवडे तरी लागतील. त्यानंतर जगातील इतर देशांमध्ये हा व्हेरियंट फैलावण्यास सुरुवात होईल. मात्र, हा व्हेरियंट किती हानीकारक आहे, याबाबत जाणून घेण्यासाठी काही दिवस तरी जातील. त्यांनी पुढे म्हटले की, ओमायक्रॉन हा डेल्टापेक्षा अधिक गंभीर नाही, हे ठरवण्याआधी सर्वांनी खबरदारी बाळगण्याची आवश्यकता आहे. 


दरम्यान, ओमायक्रॉन जीवघेणा नाही, त्याला घाबरुन जाऊ नका असं डॉ. अँजेलिक कोएत्झी (Angelique Coetzee) यांनी म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेतील ज्या डॉक्टरांनी ओमायक्रॉन या कोरोनाचा नवा व्हेरियंट शोध लावला त्या टीमपैकी डॉ. अँजेलिक कोएत्झी या एक आहेत.डॉ. अँजेलिक कोएत्झी म्हणाल्या की, "कोरोनाचा ओमायक्रॉन हा व्हेरियंट 'डेल्टा' व्हेरियंटपेक्षा घातक नाही. 'डेल्टा' व्हेरियंटची लागण झालेल्या रुग्णांपेक्षा ओमायक्रॉन बाधितांमध्ये सौम्य लक्षणं आढळतील. लहान मुलांमध्ये ओमायक्रॉन संसर्गाचं प्रमाण हे कमी आहे. टेस्टिंग, लसीकरण आणि बूस्टर डोस तसेच लहान मुलांचं लसीकरण या गोष्टींमुळे भारतातील ओमायक्रॉनचा प्रसार रोखणं शक्य आहे."


इतर महत्त्वाच्या बातम्या:



 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha