सिडनीत राहणारा 36 वर्षांचा आयझॅक मित्सुबिशी एएसएक्स कार ड्राईव्ह करत होता. स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी दुपारी तीन वाजता तो आपल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाची तयारी करण्यासाठी कारने निघाला. गाडी मागे घेताना अनवधानाने त्याने आपलाच पोटचा मुलगा जोसिया याला गाडीखाली चिरडलं.
घराजवळ असल्यामुळे आयझॅकची पत्नी अँजेलिनाच्या डोळ्यादेखत ही घटना घडली. तिने चिमुकल्याला तातडीने लिव्हरपूल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे प्रचंड मोठा मानसिक धक्का बसलेल्या आयझॅकच्या तोंडातून एक शब्दही फुटत नव्हता. पोलिसांना तो दुसऱ्या दिवसापर्यंत या घटनेची माहितीही देऊ शकला नाही. पोलिसांनी आयझॅकची मित्सुबिशी कार ताब्यात घेतली आहे.
आयझॅक तिमोहा ऑस्ट्रेलियाच्या 4 x 100 मीटर रिले संघातून 2012 मधील लंडन ऑलिम्पिक्समध्ये सहभागी झाला होता. मात्र त्यांचा संघ सहाव्या स्थानावर राहिला. 2010 साली राष्ट्रकुल स्पर्धेत रिले रेसमध्येही तो चौथ्या स्थानावर होता.