ओटावा : एअर कॅनडाचं विमान हवेतील वादळात अडकल्यामुळे 37 प्रवाशांना दुखापत झाली आहे. कॅनडामधील वॅनकुअरहून ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. विमान हवेत असताना काही प्रवासी छताला धडकून जखमी झाल्याचं सांगण्यात आलं.

AC33 वॅनकुअर-सिडनी या बोईंग 777-200 विमानाला हवाईपासून दोन तास अंतरावर असताना वादळाचा फटका बसला. त्यानंतर हवाई बेटांची राजधानी होनोलुलूमध्ये विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. यावेळी विमानात 269 प्रवासी आणि 15 क्रू मेंबर्स होते.

'विमानातील सर्व सामान खाली पडलं, तर सीट बेल्ट न लावलेले प्रवासी टपाच्या दिशेने तरंगू लागले. त्यामुळे अनेकांना लहान-मोठी दुखापत झाली' अशी माहिती जेस स्मिथ नावाच्या प्रवाशाने स्थानिक टीव्ही चॅनलला दिली.

37 जणांपैकी 9 जणांची दुखापत गंभीर असल्याची माहिती आहे. समुद्रसपाटीपासून 10 हजार 973 मीटर उंचीवर आणि होनोलुलूपासून 966 किलोमीटर अंतरावर असताना हा प्रकार घडला.

क्लीअर एअर टर्ब्युलन्स (सीएटी) म्हणजे काय?

सर्वसामान्यपणे याला वादळ संबोधलं जात असलं तरी, या प्रकाराला क्लीअर एअर टर्ब्युलन्स म्हणतात. आकाश मोकळं असूनही उघड्या डोळ्यांनी किंवा रडारवरही हे वादळ दिसत नाही. वेगवेगळ्या वेगाने वाहणाऱ्या हवेचे झोत एकमेकांवर आदळून हे टर्ब्युलन्स घडतं.

लँडिंग झआल्यानंतर एअर कॅनडातर्फे सर्व प्रवाशांच्या राहण्याची आणि खाण्या-पिण्याची व्यवस्था करण्यात आली.