वॉशिंग्टन: अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी हिलरी क्लिंटन यांना अधिकृत पाठिंबा दिलाय. ओबामांनी एका व्हीडियोद्वरा आपण हिलरी यांच्या बाजूनं असल्याचा संदेश दिलाय. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी हिलरीच योग्य व्यक्ती असल्याचं ओबामांनी म्हटलंय.

 

ओबामांचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाल जानेवारीत संपुष्टात येणार असून आठ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत नवीन राष्ट्राध्यक्षांची निवड केली जाईल.

 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी हिलरी क्लिंटन आणि बर्नी सँडर्स या डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांमध्ये चुरस रंगली होती. डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्राथमिक निवडणुकीत हिलरी यांना मिळालेलं मताधिक्य पाहता त्यांचा विजय जवळपास निश्चित झालाय. त्यात ओबामांकडून पाठिंबा मिळाल्यानं क्लिंटन यांची राष्ट्रपती पदासाठीची दावेदारीही आणखी मबजूत बनली आहे. ओबामा लवकरच क्लिंटन यांच्यासाठी प्रचारही करताना दिसतील.

 

दरम्यान सँडर्स यांनी आज व्हाईट हाऊसमध्ये ओबामांची भेट घेतली. रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्रपतीपदावर निवडून येण्यापासून रोखण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असं सँडर्स यांनी जाहीर केलंय.