इस्लामाबाद : अमेरिकेने पाकिस्तानी डिप्लोमॅट्सना देशात प्रवेश नाकारण्याचा निर्णय घेतला आहे. 1 मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. विशेष म्हणजे, पाकिस्ताननेच या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


गेल्या काही दिवसांपासून अमेरिका पाकिस्तानी डिप्लोमॅट्सना देशात येणावर निर्बंध घालण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. आता अमेरिकेने हा निर्णय घेतल्याने, पाकिस्तानची गोची झाली आहे.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयातील प्रवक्ते मोहम्मद फैजल यांनी याबाबत सांगितलं की, "पाकिस्तानी डिप्लोमॅट्सना अमेरिकेत येण्यावर निर्बंध घालण्यासंदर्भातील माहिती मिळाली आहे. 1 मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे."

"अमेरिकेच्या या निर्णयाबाबत दोन्ही देश एकमेकाच्या संपर्कात असून, यावर लवकरच तोडगा निघेल," अशी आशाही फैजल यांनी यावेळी व्यक्त केली.

यापूर्वी पाकिस्तानने अमेरिकन डिप्लोमॅट्सना देशात बंदी घातली होती. यानंतर अमेरिकेचे अंडर सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर पॉलिटिकल अफेअर्स थॉमस शैनन यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावले होते.

"ज्या प्रमाणे पाकिस्तानने त्यांच्या डिप्लोमॅट्सना देशात बंदी घातली आहे. त्याच प्रकारे अमेरिका वॉशिंग्टनमध्ये त्यासंदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी करेल," असं शैनन यांनी यावेळी सांगितलं होतं.