North Korea vs South Korea: उत्तर कोरियानं (North Korea) दक्षिण कोरियावर (South Korea) हल्ला केला असून एक, दोन नव्हे तब्बल 200 तोफगोळे डागल्याची माहिती मिळत आहे. उत्तर कोरियानं दक्षिण कोरियाच्या दिशेनं 200 तोफगोळे डागले खरे, पण दक्षिण कोरियाच्या हद्दीत तोफगोळे पडलेले नाहीत. अजुनही दोन्ही देशांच्या सीमाभागात गोंधळाचं वातावरण आहे. 


दक्षिण कोरियाच्या लष्करानं या हल्ल्याबाबत माहिती दिली. लष्करानं दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियानं दक्षिणेकडील येओनप्योंग बेटावर 200 तोफगोळे डागले. यानंतर लगेचच दक्षिण कोरियानं बेटावर राहणाऱ्या 2 हजार लोकांना हा परिसर रिकामा करण्याच्या सूचना दिल्या. दक्षिण कोरियानं या कारवाईचा निषेध केला असून याला 'प्रक्षोभक कृती' असं म्हटलं आहे. 


दक्षिण कोरियाच्या लष्करानं दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियानं शुक्रवारी 200 हून अधिक तोफगोळे दक्षिण कोरियाच्या दिशेनं डागले. दोन्ही देशांमधील वास्तविक सागरी सीमा नॉर्दर्न लिमिट लाइन (NLL) च्या उत्तरेला हे तोफगोळे पडले. मात्र, कोणतंही नुकसान झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलेलं नाही.




'या' कराराचं उल्लंघन 


दक्षिण कोरियाच्या लष्कराच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफनं म्हटलं आहे की, बफर झोनमध्ये तोफगोळे डागत उत्तर कोरियानं 2018 मध्ये दोन्ही देशांमध्ये झालेल्या कराराचं उल्लंघन केलं आहे. दरम्यान, गेल्या काही तासांमध्ये दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. उत्तर कोरियाच्या या युद्ध सरावाचं दक्षिण कोरियानं प्रक्षोभक कृत्य असं वर्णन केलं आहे.


उत्तर कोरियाचा युद्धाभ्यास


उत्तर कोरियानं युद्धाभ्यास करण्यासाठी तोफगोळ्यांचा सराव केला. नव्या शस्त्रांच्या तपासणीचा भाग म्हणून हे पाऊल उचलण्यात आल्याचं सरकारी माध्यमांनी म्हटलं आहे. प्योंगयांग अमेरिका आणि दक्षिण कोरियावर एकमेकांच्या विरोधात स्वीकारत असलेलं शत्रुत्वाचं धोरण सोडून देण्यासाठी दबाव आणत आहे.


उत्तर कोरियाच्या लष्करानं केलेलं सतर्क 


येओनप्योंग गावातील एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, दक्षिण कोरियाच्या सैन्यानं उत्तर कोरिया येओंगप्यॉन्ग बेटावर सागरी हल्ला करणार असल्याची माहिती आधीच दिली होती आणि लवकरच लोकांना तिथून सुरक्षीत स्थळी हलवण्यासही सांगितलं होतं. लष्कराच्या विनंतीनंतर हा निर्वासन आदेश जारी करण्यात आला. त्यामुळे लोकांना तातडीने जागा रिकामी करण्यास सांगण्यात आलं.