North Korea Fires Ballistic Missile: मागील काही दिवसांपासून उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र चाचणी केली जात आहे. या चाचणीमुळे उत्तर कोरियाच्या (North Korea) शेजारचे देश अधिकच सतर्क आहेत. मंगळवारी सकाळच्या सुमारास उत्तर कोरियाने जपानवरुन (North Korea fires ballistic missile ) क्षेपणास्त्र डागले. यानंतर जपानमध्ये (Japan) धोक्याचा इशारा देणारे अलार्म वाजले. अलार्म वाजल्यानंतर जपानी नागरिकांनी भूमिगत ठिकाणी आसरा घेतला. तर, देशातील उत्तर भागातील रेल्वे सेवा विस्कळीत झाली.
उत्तर कोरियाने मागील 10 दिवसात पाचवे क्षेपणास्त्र डागले. जपानसह दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने पाणबुडीविरोधी सराव केला. त्यानंतर उत्तर कोरियाकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे.
उत्तर कोरियाने डागलेले क्षेपणास्त्र पॅसिफिक महासागरात कोळण्यापूर्वी जपानच्या भूभागावरुन गेले. त्यामुळे जपानमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. या घटनेचा व्हिडीओ जारी व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सायरन वाजल्यााचा आवाज ऐकू येत आहे. रस्त्यांवर शुकशुकाट दिसला आहे. जपान सरकारने उत्तर कोरियाच्या या कृत्याचा निषेध केला आहे.
जपानचे पंतप्रधान किशीदा यांनी या क्षेपणास्त्र चाचणीचा निषेध करताना म्हटले की, एक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आपल्या देशाच्या भूभागावरुन जात पॅसिफिक महासागरात कोसळले. सातत्याने क्षेपणास्त्र डागणे ही एक हिंसक कृती असल्याचे त्यांनी सांगितले.
जपान सरकारचे प्रवक्ते हिरोकाझू म्हणाले की, "उत्तर कोरियाची कारवाई प्रक्षोभक आहे. उत्तर कोरियाकडून वारंवार बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला जात आहे. जपान आणि संपूर्ण पॅसिफिक प्रदेशाच्या शांतता आणि सुरक्षिततेला धोका आहे. उत्तर कोरियाच्या कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय समुदायासमोर गंभीर आव्हान निर्माण झाले आहे."
जपान सरकारने दिलेल्या माहितीनुसार, जपानच्या हवाई हद्दीतून क्षेपणास्त्र गेल्यानंतर सायरन वाजू लागला. जपानची स्थानिक वेळ सकाळी 7.29 वाजण्याच्या सुमारास नागरिकांना सुरक्षित स्थळी आसरा घेण्याची सूचना देण्यात आली. त्यानंतर आठ वाजण्याच्या सुमारास जपान पंतप्रधान कार्यालयाने उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानवरुन गेले असल्याचे ट्वीट केले.
इतर महत्त्वाच्या बातम्या: