North Korea Dictator : उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन ( Kim Jong Un ) नेहमीच विचित्र निर्णयांमुळे चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा किम जोंग उनने उत्तर कोरियाच्या जनतेसाठी नवं फर्मान जारी केलं आहे. किम जोंग उनला उत्तर कोरियातील मुलांची नावं गोडं नसावीत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उनने आता नवीन आदेश जारी करत देशातील बालकांची नावं बॉम्ब, बंदुक आणि सॅटेलाइट ठेवायला सांगितलं आहे. या पार्श्वभूमीवर किम जोंग उनने देशात नवा नियम लागू करण्याची घोषणा केली आहे.


'मुलांची नाव बॉम्ब, बंदुक आणि सॅटेलाइट ठेवा'


हुकूमशहा किम जोंग उनची इच्छा आहे की उत्तर कोरियातील मुलांची नावं बॉम्ब, बंदुक आणि क्षेपणास्त्रांवर असावीत. याचं कारण म्हणजे मुलांच्या नावात मवाळपणाऐवजी देशभक्तीची भावना दिसून येईल. अहवालानुसार, उत्तर कोरियामध्ये लहान मुलांची नाजूक आणि मवाळ अर्थ असलेली नावे बदलून चोंग इल (बंदूक), चुंग सिम (निष्ठा), पोक इल (बॉम्ब) आणि उई सॉंग (उपग्रह) यांसारखी नावं बदलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्यांची नावं प्रेम, सौंदर्य आणि अशा सौम्य भावनांशी निगडित आहेत, त्या बालकांची नावं बदलण्याचा आदेश देण्यात आले आहेत.


उत्तर कोरियातील लोक त्रस्त


हुकुमशाह किम जोंग उन याने नवा आदेश जारी करत, बालकांची नाव बदलण्याचे आदेश दिले आहेत. या नव्या आदेशामुळे उत्तर कोरियातील लोक त्रस्त आहेत. कारण अधिकारी त्यांना मुलांची नावं बदलण्यास सांगत आहेत. गेल्या महिन्यात नोटीस दिल्यानंतर ही प्रक्रिया सुरू झाली होती, त्यानंतर नागरिकांना मुलांची नावं बदलण्यासाठी सातत्याने दबाव आणला जात आहे. त्याविरोधात नागरिक तक्रारी करत आहेत, पण हुकुमशहाच्या आदेशापुढे त्यांचा नेम लागत नाही.


उत्तर कोरियाच्या सरकारने असे विचित्र आदेश जारी करणं हे काही नवीन नाही. उत्तर कोरियामध्ये लोकांना काय हवं आहे, याने काही फरक पडत नाही. किम जोंग उनच्या इच्छेप्रमाणे लोकांना वागावं लागतं. जर कोणी सरकारी आदेशाचं उल्लंघन केलं तर त्याला कठोर शिक्षा होते. सरकारच्या विरोधात जाण्यासाठी येथे फाशीची शिक्षाही दिली जाते. त्यामुळे सरकारचे विचित्र नियम मान्य करण्या व्यतिरिक्त येथील लोकांपुढे काही पर्याय नसतो.


11 दिवस हसण्यावर बंदी


याआधी उत्तर कोरियामध्ये 11 दिवस हसण्यावर बंदी घालण्यात आली होती. उत्तर कोरियाचे माजी हुकूमशाह किम जोंग-टू यांच्या निधनाच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त 11 दिवस शोक करण्याचे आदेश नागरिकांना देण्यात आले होते. यावेळी देशातील लोकांना हसण्यावर, खरेदीवर आणि दारू पिण्यावर बंदी घालण्यात आली होती.