स्वीडन : शरीरविज्ञानशास्त्र, भौतिकशास्त्र या क्षेत्रातील नोबेल जाहीर झाल्यनंतर आता रसायनशास्त्रातील नोबेलही जाहीर झालंय. अमेरिकेतील शास्त्रज्ञ फ्रान्सेस अरनॉल्ड, जॉर्ज स्मिथ आणि ब्रिटनचे सर ग्रेगर विंटर यांना रसायनशास्त्रातील नोबेल विभागून दिलं जाणार आहे.

फ्रान्सेस अरनॉल्ड यांना पुरस्काराची निम्मी रक्कम, तर उर्वरित निम्मी रक्कम जॉर्ज स्मिथ आणि सर ग्रेगर विंटर यांना विभागून दिली जाईल.

एन्झाईम आणि पेप्टाईडमधील संशोधनासाठी अरनॉल्ड, स्मिथ आणि विंटर यांचा सन्मान करण्यात आलाय. बायो-फ्युअलपासून मेडिसिनच्या प्रत्येक गोष्टीत वापरण्यात येणाऱ्या प्रोटीनमधील विकासासाठी तिघांनाही सन्मानित करत आहोत, असे नोबेल देणाऱ्या समितीने आपल्या पत्रकात म्हटलंय.

भौतिकशास्त्रातील नोबेल

लेझर तंत्रज्ञानात महत्त्वपूर्ण संशोधनासाठी तीन शास्त्रज्ञांना विभागून भौतिकशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. अमेरिकेतील आर्थर अश्किन, फ्रान्सचे जेरार्ड मोउरो आणि कॅनडाच्या डोना स्टिरकलँड यांना विभागून यंदाचा भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर झाला आहे. या तिघांच्या संशोधनामुळे प्रकाशाची किरणे डोळ्यांच्या सर्जरीपासून मायक्रो-मशीनपर्यंत उपकरणासारखी वापरली जाऊ लागली.

शरीरविज्ञानशास्त्रातील नोबेल

यंदाचं शरीरविज्ञानशस्त्र किंवा वैद्यकीय क्षेत्रासाठीचं नोबेल पारितोषिक जेम्स पी अलीसन आणि तासुकू होन्जो यांना संयुक्तपणे जाहीर झालं आहे. कॅन्सर अर्थात कर्करोगाशी संबंधित संशोधनासाठी त्यांचा गौरव करण्यात आला. कॅन्सर थेरपीतील महत्त्वाचं संशोधन त्यांनी केलं.