जगभरातील सर्वात मोठा पुरस्कार मानला जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांचा (Nobel award) काही दिवसांपासून घोषणा होत आहे. त्यामुळे, यंदा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. अखेर नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला असून निहॉन हिदानक्यो या जपानी (Japan) संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हिरोशिमा आणि नागासाकीतील अणूबॉम्ब पीडितांसाठी या संस्थेनं मोठं काम केलंय. अखिल विश्व अण्वस्त्र मुक्त व्हावं, यासाठी ही संस्था जे कार्य करते, त्या कार्याचा गौरव करण्यासाठी यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जपानी संस्थेला जाहीर करण्यात आला आहे. 


या आठवड्यात वैद्यकीय क्षेत्रातल्या नोबेलची घोषणा करण्यात आली असून व्हिक्टर अॅम्ब्रोस आणि गॅरी रुवकून यांना या प्रतिष्ठीत पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. microRNA आणि त्याचे कार्य यावरील शोधामुळे त्यांना नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. शरीरातील अवयवांचा विकास आणि त्याचे कार्य यासाठी हा शोध महत्त्वाचा आहे असं नोबेल कमिटीने म्हटलं आहे. आता शांततेच्या नोबेल पुरस्काराचीही घोषणा करण्यात आली आहे.  त्यानुसार, यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार निहॉन हिदानक्यो या जपानी (Japan) संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 






नोबेल पुरस्काराचा इतिहास


डायनामाईटचा शोध लावणारे शास्त्रज्ञ नोबेल यांच्या  स्मरणार्थ नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. नोबेल पारितोषिकाची सुरुवात 1901 मध्ये झाली असून 2024 पर्यंत वैद्यकीय क्षेत्रातील 229 जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचा मेडिसीन मधील नोबेल 10 डिसेंबर रोजी देण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षी 7 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीत विज्ञान, अर्थशास्त्र, साहित्य आणि शांतता यांसारख्या क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या लोकांना नोबेल पारितोषिक प्रदान केले जाणार आहे. हे पुरस्कार स्टॉकहोम, स्वीडन येथे दिले जात आहेत. दरवर्षी 11 दशलक्ष स्वीडिश क्रोनर म्हणजेच अंदाजे 8.90 कोटी रुपयांचे नोबेल पारितोषिक देण्यात येतात. 


गेल्या वर्षी नोबेल कुणाला मिळाले? 


गेल्या वेळी वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक कॅटलिन कॅरिको आणि ड्र्यू वेसमन यांना मिळाले होते. नोबेल पारितोषिक देणाऱ्या समितीने सांगितले होते की, त्यांनी दिलेल्या mRNA तंत्रज्ञानाने बनवलेल्या कोरोना लसीमुळे जग कोरोना महामारीतून बाहेर येऊ शकते. वास्तविक, कोरोनादरम्यान पहिल्यांदाच असे घडले जेव्हा mRNA तंत्रज्ञानावर आधारित लस तयार करण्यात आली. हे Pfizer, Bio N Tech आणि Moderna यांनी बनवले होते.