रिओ दी जानेरो : रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर निवड झाली आहे. गुरूवारी त्यांची ही निवड झाली असून आयओसीमध्ये सदस्यपदी निवडलेल्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत. नुकतीच आयओसीकडून याची अधिकृत घोषणा करण्यात आली.


 

नीता अंबानी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर भारताच्या सदस्या म्हणून वयाच्या 70 वर्षांपर्यंत राहणार असून त्यांना जून 2016 मध्ये नामांकन देण्यात आलं होतं.

 

ऑलिम्पिक खेळ सुरू होण्याआधी एक दिवस नीता अंबानी यांची निवड झाली आहे. रिओ दि जानेरोमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिंम्पिक समितीच्या 129 व्या सत्रातील बैठकीत त्यांना हे सदस्यत्व देण्यात आले.

 

"आयओसीचे सदस्यत्व मिळाल्यामुळे मी खूप खूश आहे. जागतिक पातळीवर भारतीचं वाढतं महत्त्व आणि भारतीय महिलांचा हा सन्मान आहे." असं त्यांनी सदस्यपद मिळाल्यावर सांगितलं.

 

"मी नेहमीच तरूणांच्या विकासासाठी खेळांना एक प्रेरक शक्ती मानते. खेळ विविध संस्कृती, समाज यांना एकत्र आणण्याचे काम करतात. त्यामुळे संपूर्ण देशात ऑलिम्पिकची भावना आणि खेळांना पोहोचवण्याचा प्रयत्न करेन." असंही त्यांनी सांगितलं.