इस्लामाबाद : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कलम 370 रद्द करण्याच्या प्रस्तावावर राज्यसभेत केलेलं भाषण चांगलच गाजलं. या भाषणाचे पडसाद थेट पाकिस्तानात उमटल्याचे आता पाहायला मिळत आहेत. इस्लामाबादेत जागोजागी संजय राऊत यांचे पोस्टर्स लागले आहेत.


संजय राऊत यांनी राज्यसभेत विधेयकाच्या चर्चेत काल (05 ऑगस्ट) जम्मू-काश्मीर खऱ्या अर्थानं भारतात घेतलं, पुढे पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानही घेऊ, असं विधान केलं होतं. राऊत यांच्या या विधानाचा इस्लामाबादेत पोस्टर्स लावून निषेध नोंदवण्यात आला. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भाषणाची दखल इस्लामाबादलाही घ्यावी लागली आहे.

संजय राऊतांनी त्यांच्या भाषणात केलेल्या विधानाचे पोस्टर्स इस्लामाबादमधील रस्त्या-रस्त्यांवर झळकत आहेत. हे पोस्टर्स पाहून पाकिस्तानी नागरिक संतापले आहेत. त्यांनी हे पोस्टर्स काढायला सुरुवात केली आहे.

पोस्टरवर काय लिहिलंय?
इस्लामाबादमध्ये झळकलेल्या पोस्टर्सवर 'महाभारत स्टेप फॉरवर्ड' असे शीर्षक लिहिण्यात आहे. त्याखाली संजय राऊतांचे पूर्ण विधान लिहिण्यात आले आहे. "आज कश्मीर लिया है। कल बलूचिस्तान और पाकिस्तान ऑक्युपाइड कश्मीर ले लेंगे। मुझे विश्वास है की पीएम मोदी अखंड हिंदुस्तान का सपना पूरा करेंगे।"

पाकिस्तान संतापले
इस्लामाबादेत लागलेल्या या पोस्टर्सवर पाकिस्तानी नागरिक प्रचंड संतापले आहेत. पाकिस्तानी नागरिक याबाबत म्हणाले की, एक देश म्हणून आपण कुठे जात आहोत? आमच्या देशात, आमच्या शहरात, आमच्या डोळ्यांसमोर भारतीय लोक त्यांचे पोस्टर्स लावत आहेत. परंतु आमचे लोक झोपले आहेत. जिथवर आमची नजर जाईल तिथवर असे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. इस्लामाबादच्या सगळ्या रस्त्यांवर हे पोस्टर्स लागले आहेत.

व्हिडीओ पाहा