नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसांच्या युरोप दौऱ्यानिमित्त सध्या रशियात आहेत. काल त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेऊन, विविध विषयावर चर्चा केली, त्यानंतर पत्रकारांना संबोधित केलं.

पंतप्रधान मोदींच्या रशिया भेटी दरम्यान, त्यांनी एका न्यूज चॅनेलला मुलाखतही दिली. पण ही मुलाखत घेणाऱ्या महिला अँकरने त्यांना असा काही प्रश्न विचारला, त्यामुळे सर्वांनाच अश्चर्याचा धक्का बसला.


मोदींनी काल रशियातील एनबीसी न्यूज चॅनेलला मुलाखत दिली. ही मुलाखत मेगन केलीने घेतली. या मुलाखतीपूर्वी पंतप्रधान मोदींनी तिला सांगितलं की, मी तुझा छत्रीचा फोटो ट्विटरवर पाहिला आहे. यावर मेगन पंतप्रधानांना म्हणाली की, यापूर्वी आपण ट्विटरवर भेटलो आहोत.

पण केलीच्या Are you on Twitter? या प्रश्नाने संपूर्ण सभागृहात हशा पिकला. पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्या मुलाखतीपूर्वीचा हा व्हिडीओ मेगनने ट्विटरवर पोस्ट केला आहे. शिवाय तिचा हा व्हिडीओ यूट्यूबवरही उपलब्ध आहे.



दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि व्लादिमीर पुतीन यांच्या भेटीनंतर पुतीन यांनी भारतासोबत रशियाचं विश्वासाचं नातं आहे, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच अनेक संवेदनशील क्षेत्रांमध्ये रशियाचा जगभरात भारतासारखा मित्र नाही. भारत सर्वात जवळच्या देशांपैकी एक आहे, असं रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलं आहे.

यावेळी जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद रोखण्यासाठी पाकिस्तानवर दबाव टाकणार का, असाही प्रश्न पुतीन यांना विचारण्यात आला. दहशतवादाच्या मुद्द्यांवर रशिया नेहमी भारतासोबत असेल. मात्र पाकिस्तान आपल्या देशातील परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे, असंही पुतीन म्हणाले.