New Year 2020 : न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात नववर्षांचं स्वागत; आतषबाजी, रोषणाईनं आसमंत उजळला
एबीपी माझा वेब टीम | 31 Dec 2019 06:00 PM (IST)
न्यूझिलंडमधील ऑकलॅन्डमध्ये जल्लोषात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. आकाशात जल्लोषात आतिषबाजी करत नागरिकांनी नववर्षाचं स्वागत केलं. जणू काही ऑकलँडचं आकाश फटाकांच्या रंगात रंगून गेलं होतं.
मुंबई : आज 31 डिसेंबर 2019 या वर्षाचा शेवटचा दिवस. अजून भारतात नवीन वर्ष सुरू होण्यासाठी 7 तासांपेक्षा जास्त वेळ बाकी आहे. परंतु, न्युझिलंडमध्ये नवीन वर्षाचं आगमन झालं आहे. न्यूझिलंडमधील ऑकलॅन्ड शहराची वेळ ही भारतापेक्षा जवळपास साडेतास तासांनी पुढे आहे. याच कारणामुळे न्यूझिलंडमधील ऑकलॅन्डमध्ये जल्लोषात नववर्षाचं स्वागत करण्यात आलं. आकाशात जल्लोषात आतिषबाजी करत नागरिकांनी नववर्षाचं स्वागत केलं. जणू काही ऑकलँडचं आकाश फटाकांच्या रंगात रंगून गेलं होतं. भारतामध्येही लोक आतुरतेनं 2020ची वाट पाहत आहेत. अनेकांनी नववर्षाच्या स्वागतासाठी खास तयारी केली आहे. नवीन वर्षाच्या दिवशी राजधानी दिल्लीमध्ये इंडिया गेटवर मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र येतात. तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतही विविध ठिकाणी नववर्षाच्या आगमनासाठी लोक एकत्र येतात. 31 डिसेंबरच्या दिवशी मुंबईतील समुद्र किनाऱ्यांवर अनेक लोक नववर्षाचं स्वाग करण्यासाठी गर्दी करतात. फटाक्यांची आतिशबाजी करत नववर्षाचं अगदी उत्साहात स्वागत करतात. एवढंच नाहीतर न्यू ईयरच्या दिवशी चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, तिरूअनंतपुरम, हैदराबाद, लखनौ, पाटना यांसारख्या शहरांतही खास तयारी केली जाते. या शहरांतील प्रसिद्ध ठिकाणी लोक एकत्र येतात. न्यू ईयरच्या निमित्ताने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या वतीने खास खबरदारी घेण्यात येते. न्यूझीलंडप्रमाणेच ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्येही नववर्षाच्या स्वागताला सुरुवात झाली आहे. सिडनी हार्बर येथे मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.