KitKat V : चॉकलेट (Chocolate) खायला आवडत नाही, अशी फार क्वचित लोकं या जगात आढळत असतील. लहान असो वा मोठे, सगळेच चॉकलेटचे चाहते आहेत. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना वेफर चॉकलेट खायला देखील खूप आवडते. ‘किटकॅट’ हे वेफर चॉकलेट सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. अनेकांना किटकॅट आवडते. आपणही लहानपणी याची चव नक्कीच चाखली असेल. आता नेस्ले (Nestle) चॉकलेट प्रेमींसाठी खास ‘विगन किटकॅट’ (KitKat V) लाँच करत आहे. आता जगातील सर्वात लोकप्रिय चॉकलेटची प्लांट-बेस्ड आवृत्ती, अर्थात विगन किटकॅट लवकरच बाजारात येणार आहे. यूकेसह 15 युरोपीय देशांमध्ये ‘विगन किटकॅट’ लाँच करण्याची योजना सुरु आहे.


ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, क्लासिक किटकॅटच्या विगन व्हर्जनमध्ये दुधाला पर्याय म्हणून तांदूळ-आधारित घटकांचा वापर केला जाणार आहे. हे एका मोठ्या चॉकलेट ब्रँडच्या विगन व्हर्जनचे सर्वात मोठे लाँचिंग असणार आहे. या नव्या फॉर्म्युलाला विकसित होण्यासाठी दोन वर्षे लागली.


चॉकलेट क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण बाजारपेठ


नेस्लेच्या युरोपमधील कन्फेक्शनरी प्रमुख कॉरीन गॅबलर म्हणाले की, ‘आमच्याकडे 10 पैकी चार ग्राहक असे आहेत जे म्हणतात की, त्यांना विगन आहाराकडे वळायचे आहे. त्यामुळे आता ही चॉकलेट क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण बाजारपेठ असू शकते.’ विगन चॉकलेट मार्केटची किंमत सध्या 533 दशलक्ष डॉलर इतकी आहे आणि येत्या 10 वर्षांत ती दुप्पट ते 1.4 बिलियन डॉलर होण्याची अपेक्षा आहे.


नवीन उत्पादन लाँच केल्यावर ते फ्लॉप होण्याची भीती!


अनेक छोट्या ब्रँड्सनी दुधाच्या चॉकलेटला पर्याय म्हणून याची सुरुवात केली होती आणि आता मोठमोठे त्यांना ब्रँड फॉलो करत आहेत. ‘मार्स’ने (Mars) त्याच्या बाउंटी, टॉपिक आणि गॅलेक्सी बारचे विगन व्हर्जन सादर केले आहे. मॉन्डेलेझ इंटरनॅशनल इंकच्या कॅडबरीने डेअरी मिल्कचे विगन व्हर्जन म्हणून गेल्या वर्षी प्लांट बार रिलीज केला होता. मात्र, यातही काही अडथळे आले आहेत. ब्रिटनचे सर्वात मोठे किराणा विक्रेता ‘टेस्को पीएलसी’ने अलीकडेच लेबलिंगच्या वादामुळे मार्स इंकच्या गॅलेक्सी चॉकलेट बारच्या विगन व्हर्जनचा साठा करणे थांबवले आहे. एखादे नवीन उत्पादन लाँच केल्यावर ते फ्लॉप देखील होऊ शकते.  याआधी नेस्लेने 30% कमी साखर असलेले मिल्कीबार वोसोम्स कमी मागणीमुळे बंद केले होते.


किंमतीत फरक कमी करण्याकडे अधिक लक्ष


मात्र, आता नेस्लेला KitKat V कडून खूप अपेक्षा असून, अधिक उत्पादनासाठी 300 टनांपासून सुरुवात करत आहोत, असे गॅबलर म्हणाले. युरोपमध्ये दरवर्षी सुमारे दहा हजार टन किटकॅट प्रोडक्ट विकले जातात, त्यांच्याशी याची तुलना होणार आहे. मात्र, सध्या KitKat V ची किंमत इतर चॉकलेटपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. याचे मुख्य कारण म्हणजे उत्पादनासाठी येणारा अधिकचा खर्च. यासाठी लागणारे साहित्य देखील याच्या किंमतीवर परिणाम करणारे आहे.


गेल्या वर्षी नेस्लेने चाचणीदरम्यान काही बाजारांमध्ये या विगन किटकॅटची विक्री सुरु केली. इतर किटकॅटची किंमत ही 60 ते 70 पेन्स (भारतीय किंमत 55 ते 65 रुपये) दरम्यान होती, तर KitKat Vची विक्री 90 पेन्स (85 रुपये) ठेवण्यात आली होती. गॅबलर म्हणाले की, कंपनी किंमतीतले हे अंतर शक्य तितके कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे.


प्रक्रिया खूप आव्हानात्मक!


नेस्ले कन्फेक्शनरी प्रोडक्ट टेक्नॉलॉजी सेंटरचे प्रमुख लुईस बॅरेट म्हणतात की, चॉकलेटप्रेमींना ज्याप्रमाणे नॉन-विगन चॉकलेटमध्ये क्रीमी टेक्सचर मिळते, त्याच प्रमाणे ते विगन चॉकलेटमध्येही मिळावे यासाठी तांदूळ-आधारित फॉर्म्युला सेट करण्यापूर्वी नेस्लेने ओट्स, सोया आणि बदाम यासह अनेक पर्यायांचा वापर करून पाहिला होता. ही प्रक्रिया खूप आव्हानात्मक आहे. तरीही आमच्या रिसर्च तज्ज्ञांनी याच्या शक्य तितक्या जवळ जाण्याचे काम काम केले आहे.


हेही वाचा :


Health Tips : डार्क चॉकलेटचे सेवन आरोग्यास फायदेशीर की हानिकारक?


World Chocolate Day : खरंच चॉकलेट आरोग्यासाठी चांगले आहे? जाणून घ्या संपूर्ण माहिती