काठमांडू: नेपाळच्या राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी पंतप्रधान के.पी. ओलींच्या शिफारसीवरुन संसद बरखास्त केली आहे. त्यांनी एप्रिल आणि मे महिन्यात नेपाळच्या मध्यावधी निवडणूका घेण्यात येतील अशीही घोषणा केली आहे.


राष्ट्रपती भवनने याबाबात एक परिपत्रक जाहीर केलं असून मध्यावधी निवडणूक ही पुढच्या वर्षी 30 एप्रिल आणि 10 मे अशा दोन टप्प्यात घेणार असल्याचं सांगितलं आहे. नेपाळच्या राज्यघटनेच्या कलम 76, कलम 85, खंड एक आणि खंड सात अनुसार पंतप्रधानांच्या शिफारसीवरुन नेपाळची संसद बरखास्त करण्यात आली आहे.


संसदेच्या बरखास्तीची शिफारस
नेपाळमध्ये मंगळवारी पंतप्रधान ओली यांनी एक अध्यादेश काढला होता. त्याला राष्ट्रपतींनीही मंजुरी दिली होती. पण तो अध्यादेश मागे घ्यावा म्हणून त्यांच्यावर मोठा राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. त्या पार्श्वभूमीवर ओली यांनी रविवारी सकाळी कॅबिनेटची आपत्कालीन बैठक बोलवली होती. या बैठकीत ते अध्यादेश मागे घेतील अशी आशा होती. पण त्यांनी संसदेच्या बरखास्तीचा ठराव पारित केला आणि तशी शिफारस राष्ट्रपतींना केली.


सत्तारुढ नेपाळ कम्युनिस्ट पक्षामध्ये गेले काही दिवस अतर्गत कलह सुरु आहे. यामध्ये दोन गट पडले असून त्यांचे मतभेद टोकाला गेले आहेत. एका गटाचे नेतृत्व पंतप्रधान ओली करतात तर दुसऱ्या गटाचे नेतृत्व पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान प्रचंड हे करतात. ओली यांच्या संसद बरखास्त करण्याच्या शिफारसीच्या निर्णयावर सत्ताधारी पक्षाचे अनेक नेते नाराज होते.


संबंधित बातम्या: