लुंबिनी: नेपाळमध्ये पोखरा ते जोमसोम या ठिकाणी जात असलेल्या बेपत्ता विमानाचे अवशेष सापडल्याची माहिती समोर आली आहे. नेपाळमधील मुस्टांग या ठिकाणी या विमानाचे अवशेष सापडले असून बचाव पथक त्या ठिकाणी पोहचत असेल. या विमानामध्ये एकूण 22 प्रवासी प्रवास करत होते, त्यामधील चार प्रवासी हे भारतीय होते. 


ही माहिती मिळताच त्या ठिकाणी बचाव पथक रवाना झालं आहे. पण खराब हवामानामुळे या ठिकाणी पोहोचण्यास बचाव पथकाला अडचणी येत असल्याची माहिती आहे. त्याआधी जोमसोम एअरपोर्टच्या ट्रॅफिक कंट्रोल विभागाने सांगितलं होतं की त्यांना एका मोठ्या धमाक्याचा आवाज ऐकू आला. पण त्यांची त्यांना पृष्टी करता आली नव्हती. धमाका ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी हेलिकॉप्टर पाठवण्यात आलं होतं. ज्या ठिकाणी धमाका झाला त्याच ठिकाणी त्या विमानाचा शेवटी संपर्क तुटला होता.


तारा एअरचे  9 NAET डबल इंजिन विमानाने पोखरातून जॉमसमसाठी सकाळी 9.55 वाजता उड्डाण घेतलं होतं. या विमानाचे सारथ्य कॅप्टन प्रभाकर घिमिरे करत होते. 


मुंबईतील एकाच कुटुंबातील चार प्रवासी
या विमानात चार भारतीय प्रवाशांसोबत एकूण 22 प्रवासी प्रवास करत होते. यामधील चारही भारतीय प्रवासी हे मुंबईतील एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे. अशोक कुमार त्रिपाठी, धनुष त्रिपाठी, रितिका त्रिपाठी आणि वैभवी त्रिपाठी असं या चार भारतीय प्रवाशांची नावं आहेत. 


मदत आणि बचाव कार्य सुरू 
विमान कोसळल्याच्या शक्यतेने मदत आणि बचाव कार्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जात आहे. गृह मंत्रालयाने विमानाच्या शोधासाठी दोन खासगी विमाने पाठवली आहेत. त्याशिवाय नेपाळ लष्कराचे MI-17 हेलिकॉप्टरदेखील शोधासाठी पाठवण्यात आले आहे.