नवी दिल्ली: टाइम मासिकाच्या यादीत स्थान न मिळालेल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘फोर्ब्स’ने आपल्या यादीत स्थान दिलं आहे.

जगातील दहा प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदींचा समावेश करण्यात आला आहे. जगप्रसिद्ध फोर्ब्स या मासिकाने ही यादी जाहीर केली आहे.

या यादीत नरेंद्र मोदींना नववं स्थान मिळालं आहे.

महत्त्वाचं म्हणजे या यादीत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन हे अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

जगातील 75 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत मोदी नवव्या क्रमांकावर आहेत.

ट्रम्प तिसऱ्या नंबरवर

या यादीत गेल्या चार वर्षांपासून ब्लादिमीर पुतीन पहिल्या क्रमांकावर होते. मात्र जिनपिंग यांनी त्यांना यंदा मागे टाकलं आहे.

दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे तिसऱ्या तर जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल चौथ्या स्थानावर आहेत.

अमेझॉनचे प्रमुख पाचव्या स्थानी

प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत ई-कॉमर्स वेबसाईट अमेझॉनचे प्रमख जेफ बेजोस यांनी पाचवं स्थान पटकावलं आहे.

यानंतर मग पोप फ्रान्सिस, बिल गेट्स, सौदी अरेबियाचा युवराज मोहम्मद बिन सलमान अल सौद, नरेंद्र मोदी, गुगलचे सीईओ लॅरी पेज यांचा नंबर आहे.

फोर्ब्सच्या यादीतील 10 शक्तीशाली व्यक्ती

  1. शी जिनपिंग, अध्यक्ष, चीन

  2. ब्लादिमीर पुतीन, अध्यक्ष, रशिया

  3. डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका

  4. एंजेला मर्केल, चान्सलर, जर्मनी

  5. जेफ बेजोस, संस्थापक, अमेझॉन

  6. पोप फ्रान्सिस, धर्मगुरु, रोमन कॅथलिक चर्च

  7. बिल गेट्स, संस्थापक, बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशन

  8. सौदी अरेबियाचा युवराज मोहम्मद बिन सलमान अल सौद

  9. नरेंद्र मोदी, पंतप्रधान, भारत

  10. लॅरी पेज, गुगलचे सीईओ


या यादीत फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्ग 13 व्या स्थानी, तर अॅपलचे सीईओ टिम कुक 24 व्या, रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी 32 व्या स्थानी आहेत.

फोर्ब्सच्या 75 जणांच्या यादीत मोदी आणि मुकेश अंबानी या दोघांनीच स्थान मिळवलं आहे.
जगभराची लोकसंख्या जवळपास 7.5 अब्ज इतकी आहे. मात्र या 75 व्यक्तींनी जगाचं लक्ष वेधलं आहे. फोर्ब्सच्या प्रभावशाली व्यक्तींच्या वार्षिक अहवालात, प्रत्येकी 10 कोटी लोकांमागे 1 व्यक्ती प्रभावशाली व्यक्ती म्हणून निवडला जातो. ज्यांचं काम इतरांपेक्षा वेगळं आहे.

जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतात मोदी आजही लोकप्रिय आहेत, असं फोर्ब्सने म्हटलं आहे. शिवाय फोर्ब्सने मोदींनी केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचाही उल्लेख केला आहे.

शिवाय मोदींनी डोनाल्ड ट्रम्प, शी जिनपिंग यांची भेट घेत जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. तसंच मोदींनी जागतिक हवामान बदलाबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरु असलेल्या प्रयत्नात महत्त्वाची भूमिका बजावली होती.