इस्लामाबाद : 1985 नॅशनल जिओग्राफिक मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकलेली विस्मयकारी डोळ्यांची मलिका शरबत गुलावर गजाआड जाण्याची नामुष्की ओढावली आहे. अफगाणिस्तानातून शरणार्थी म्हणून पाकिस्तानात दाखल झालेल्या शरबतवर बनावट ओळखपत्र बनवून पाकिस्तानात अवैध वास्तव्य केल्याचा आरोप आहे.
गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या चौकशीनंतर शरबत गुलाची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या तपास अधिकाऱ्यांनी बुधवारी पेशावरमधील घरातून शरबत गुलाला अटक केली.
पाकिस्तानने नुकतीच बनावट ओळखपत्रांविरोधात कारवाई सुरु केली आहे. पाकिस्तानात हजारोंच्या संख्येने अफगाणिस्तानमधून आलेले शरणार्थी राहत आहेत. पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार शरबत गुलाने शरबती बीबी नावाने एप्रिल 2014 मध्ये ओळखपत्रासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी शरबत अफगाणिस्तानातील गावात पती आणि तीन मुलींसह राहत होती. त्यानंतर ती पाकिस्तानच्या पेशावरमध्ये राहू लागली.
शरणार्थींविरोधात पाकिस्तान सरकारची मोहीम
मागील काही दिवसांपासून बनावट ओळखपत्र बनवून पाकिस्तानात राहत असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात सरकारने मोहीम उघडली आहे. या मोहीमेत 60,675 लोकांना बनावट ओळखपत्रासह पकडलं आहे, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.
कोण आहे शरबत गुला?
1984 साली स्टीव्ह मॅक्युरी या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या छायाचित्रकाराने पाकिस्तानमधील रेफ्यूजी कॅम्पमध्ये एका 12 वर्षीय किशोरवयीन तरुणीचा फोटो काढला होता. त्या फोटोतील हिरव्या डोळ्यांनी जगभराचं लक्ष वेधलं होतं.
पण त्या फोटोनंतर शरबत गुलाचा कोणताही ठावठिकाणा नव्हता. पण तब्बल 17 वर्षांनंतर स्टीव्ह मॅक्युरी यांनी पुन्हा पाकिस्तानमध्ये तिचा शोध घेतला आणि शरबत गुला पुन्हा एकदा जगासमोर आली होती.
'द अफगाण गर्ल' नावाने परिचित असणाऱ्या शरबत गुलाची तुलना लिओनार्डो दा विन्चीच्या 'मोनालिसा' सोबतही केली जात होती.
शरबत गुलाने एका बेकरशी लग्न केलं असून ती तीन मुलींची आई आहे.
शरबतची हरतऱ्हेने मदत करणार : स्टीव्ह मॅक्युरी
दरम्यान, शरबत गुलाची हरतऱ्हेने मदत करणार, असा निर्धार छायाचित्रकार स्टीव्ह मॅक्युरी यांनी केला आहे. मी त्या परिसरातील माझ्या मित्रांच्या संपर्कात असून सगळ्याप्रकारे प्रयत्न करत आहे. शरबत आणि तिच्या कुटुंबाला कायदेशीर आणि आर्थिक मदत उपलब्ध करुन देण्यासाठी मी वचनबद्ध आहे, अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. शरबतने आयुष्यभर अनेक अडचणींचा सामना केला आहे, असं मॅक्युरी यांनी सांगितलं.