जेरुसलेम : जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांना इस्रायलमध्ये मिळालेल्या पाहुणचारावरुन आंतरराष्ट्रीय पातळीवर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. आबे दाम्पत्याला बुटातून सर्व्ह करण्यात आलेल्या डेझर्टमुळे जगभरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.


जपानचे पंतप्रधान शिंजो आबे 2 मे रोजी सपत्नीक इस्रायल दौऱ्यावर गेले होते. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू आणि त्यांची पत्नी सारा यांच्यासोबत पंतप्रधान निवासस्थानी आबेंसाठी डिनर आयोजित करण्यात आलं होतं.

नेत्यानाहूंचे खाजगी आचारी असलेले इस्रायलचे प्रसिद्ध शेफ मोशे सेगेव यांनी जेवणानंतर चॉकलेट्स खायला आणले. मात्र हे चॉकलेट धातूपासून बनवलेल्या बुटात सर्व्ह करण्यात आलं होतं.

जपानी संस्कृतीमध्ये बूट अपमानकारक मानले जातात. फक्त घरातच नाही, तर कार्यालयातही पादत्राणं घालणं जपानी नागरिक निषिद्ध मानतात. त्यामुळेच चपला, शूज घर आणि कार्यालयांच्या बाहेर काढली जातात. फक्त सामान्य माणूसच नाही, तर मंत्री आणि पंतप्रधानही आपल्या कार्यालयात चप्पल घालत नाहीत.


खरं तर शिंजो आबे यांनी बूटातून सर्व्ह केलेली चॉकलेट्स खाल्ली, मात्र तिथे उपस्थित जपानी आणि इस्रायली डिप्लोमॅट्सना ही बाब खटकली. जगातील कोणत्याच संस्कृतीत बूट जेवणाच्या टेबलवर ठेवले जात नाहीत, अशा शब्दात जगभरातून टीका केली जात आहे.

इस्रायलच्या परदेश व्यवहार विभागाने मात्र आपल्या शेफची पाठराखण केली आहे. आमचे शेफ क्रिएटिव्ह असल्याचं सांगत त्यांची तारीफच करण्यात आली.