ट्रम्प यांना विजयाच्या शुभेच्छा देताना भारत आणि अमेरिकेतील संबंध आणखी मजबूत होतील, अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी व्यक्त केली. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा आणि नरेंद्र मोदी यांचेही चांगले संबंध असल्याचं गेल्या काही वर्षांत पाहायला मिळालं.
डोनाल्ड ट्रम्प सर्व अंदाज चुकवत अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या तगड्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा पराभव झाला. त्यामुळे अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली.
डोनाल्ड ट्रम्प यांना 276 तर हिलरी क्लिंटन 218 इलेक्ट्रोलर वोट्स मिळाले. 270 ही मॅजिक फिगर होती. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अगदी अटीतटीची लढाई झाली. या निवडणुकीत सर्वात आधी 270 इलेक्टोरल व्होट्स मिळवणारा उमेदवार विजेता ठरतो. 270 चा हा मॅजिक नंबर गाठण्यासाठी ट्रम्प आणि हिलरीमध्ये जोरदार चुरस दिसून आली.
अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आलो, तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखं काम करु, असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी सिक्सर लगावला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण हिंदूंचे प्रशंसक असल्याचं सांगत निवडून आल्यास मोदींसारखी धोरणं अमेरिकेत लागू करु, अशी घोषणा केली.