न्यूयॉर्क:  सर्व अंदाज चुकवत डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. राष्ट्रध्यक्षपदासाठीच्या तगड्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा पराभव झाला. त्यामुळे अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाली.


डोनाल्ड ट्रम्प यांना 276 तर हिलरी क्लिंटन 218 इलेक्ट्रोलर वोट्स मिळाले. 270 ही मॅजिक फिगर होती.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत हिलरी क्लिंटन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अगदी अटीतटीची लढाई झाली.

या निवडणुकीत सर्वात आधी 270 इलेक्टोरल व्होट्स मिळवणारा उमेदवार विजेता ठरतो.  270चा हा मॅजिक नंबर गाठण्यासाठी ट्रम्प आणि हिलरीमध्ये जोरदार चुरस दिसून आली.

कोण आहेत डोनाल्ड ट्रम्प ?

रिपब्लिकन पक्षाची उमेदवारी मिळवण्याआधी ट्रम्प रिअल इस्टेटच्या दुनियेतलं सर्वात मोठं नाव मानले जायचे. न्यूयॉर्कच्या क्षितिजावर दिसणाऱ्या गगनचुंबी इमारतींपैक ट्रम्प टॉवर, ट्रम्प प्लेस, ट्रम्प पार्क, ट्रम्प प्लाझा… अशा इमारती डोनाल्ड यांनी उभारल्यात. स्वतः ट्रम्प फ्लोरिडात पाम बीच इथं अलिशान ट्रम्प पॅलेसमध्ये राहतात. ट्रम्प यांच्या व्यावसायिक यशाचंच या इमारती प्रतीक आहेत.

ट्रम्प यांचे वडील फ्रेडरिक ट्रम्पही बांधकाम व्यवसायात होते. ट्रम्प यांनी तो वारसा पुढं नेलाय. गेल्या 40 वर्षांत ट्रम्प यांच्या उद्योग साम्राज्याचा पसारा एवढा वाढला, की ते जवळपास 100 कंपन्यांचे मालक बनले.

1946 साली न्यूयॉर्कमध्ये ट्रम्प यांचा जन्म झाला. त्यांनी विज्ञानशाखेतून शिक्षण घेतलं. कॉलेजच्या दिवसांत एक विद्यार्थी नेता म्हणून आपली ओळख बनवली. खेळाकडेही त्यांचा ओढा होता. पैजा लावणं आणि त्या जिंकणं हा ट्रम्प यांचा छंदच आहे.

एक कुशल वक्ता अशी ट्रम्प यांची ओळख आहे. भाषणं ठोकण्याची आणि गर्दी जमवण्याची कला त्यांना अवगत आहे. अर्थात निवडणुकीआधी हिलरी यांच्यासोबत झालेल्या वादचर्चेत ते काहीसे मागे पडल्यासारखेही वाटले.

टीकाकारांच्या मते ट्रम्प केवळ मेक अमेरिका ग्रेट अगेन अशी घोषणाबाजी करतात, मी सगळं सुधारेन असं म्हणतात, पण त्यांच्याकडे तशी कोणतीही ठोस योजना दिसत नाही. अनेकदा बोलण्याच्या ओघात ते वादग्रस्त विधानं करतात.

अमेरिकेतील मुस्लिम समुदाय असो, मेक्सिकन वंशाचे नागरिक असोत किंवा स्त्रिया. या सर्वांविषयी भडकावू विधानांमुळंच ट्रम्प अलीकडे जास्त चर्चेत राहिले आहेत. अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये मोठी भिंत बांधण्याचा त्यांचा मानस आहे, जेणेकरून मेक्सिकन आणि सीरीयन शरणार्थी अमेरिकेत येणार नाहीत. पण अशा कट्टर विचारसरणीमुळं एका मोठ्या वर्गात त्यांची लोकप्रियताही वाढली आहे.

संबंधित बातम्या

डोनाल्ड ट्रम्प यांची कारकीर्द

हिलरी क्लिंटन यांची कारकीर्द

स्पेशल रिपोर्ट : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवड कशी होईल?

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभेत संशयित व्यक्ती घुसल्याने गोंधळ

आधी मोदींची स्तुती, आता घोषणांचीही कॉपी

निवडून आलो, तर मोदींसारखी कामं करेन, ट्रम्पची स्तुतिसुमनं