Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील पक्तिका प्रांतात झालेल्या मोठ्या भूकंपात सुमारे 1000 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात बरेच लोक जखमीही झाल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत भारताने हवाई दलाच्या विमानाने अफगाणिस्तानला मदत सामग्री पाठवली आहे, जी गुरुवारी काबूलला पोहोचल्यानंतर शुक्रवारी सकाळी भूकंपग्रस्त भागातील अफगाणिस्तानातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली. 


तालिबान अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव (PAI) जेपी सिंग यांनी शुक्रवारी भारताची मानवतावादी मदतीची पहिली खेप अफगाणिस्तानला सुपूर्द केली. भारताने अफगाणिस्तानला भूकंप मदत सहाय्याच्या पहिल्या खेपेमध्ये फॅमिली रिज टेन्ट,स्लीपिंग बॅग, ब्लँकेट, झोपण्याच्या चटई यासह अनेक आवश्यक वस्तूंचा समावेश आहे.


भूकंपात एक हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू


पक्तिका प्रांतात बुधवारी सकाळी भूकंपाचा मोठा हादरा बसल्यानंतर मदतकार्य सुरू आहे. पक्तिका प्रांतातील बरमल आणि जियान जिल्हे आणि खोस्त प्रांतातील स्पेरा जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 1000 लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे जीव गमावलेल्या लोकांव्यतिरिक्त 1455 लोक जखमी झाले आहेत. सध्या भारताने अफगाणिस्तानमधील या भीषण भूकंपामुळे पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे. यासोबतच भारताने या गरजेच्या काळात मदत देण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे.


तालिबानने भारताचे केले कौतुक


दरम्यान, तालिबानने अफगाणिस्तानमध्ये भारताचे दूतावास पुन्हा सुरू करण्याच्या आणि आपली तांत्रिक टीम परत पाठवण्याच्या भारताच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. यासोबतच अफगाणिस्तानचे राजदूत फरीद मामुंदझाई यांनी या कठीण काळात एकता आणि समर्थन व्यक्त केल्याबद्दल भारताचे कौतुक केले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Pakistan : ISI ने मृत घोषित केलेला 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड साजिद मीर जिवंत, पाकिस्तानमधून अटक
Covid प्रमाणेच Monkeypox लाही जागतिक आणीबाणी घोषित केली जाणार? WHO ने बोलावली आपत्कालीन बैठक
Monkeypox : मंकीपॉक्सचा धोका वाढला! 58 देशांमध्ये प्रसार, WHN कडून महामारी घोषित, काय आहे धोका? जाणून घ्या