यंगून: भारताचा शेजारी देश म्यानमारमध्ये लोकशाही सरकार उलथवून लष्कराने पुन्हा एकदा सत्ता हाती घेतलीय. यावर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी नाराजी व्यक्त केली असून त्यांनी म्यानमारवर आर्थिक निर्बंध लावण्याची धमकी दिली आहे. म्यानमारमध्ये आंग सान सू ची यांचे लोकशाही सरकार अस्तित्वात होते.


लष्कराने लोकशाही सरकार उलथवून सत्ता हाती घेतल्यानंतर आंग सान सू ची, राष्ट्रपती विन मिन्ट आणि अनेक महत्वाच्या नेत्यांना अटक केल्याचं वृत्त आहे. तसेच महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे. अमेरिकन अध्यक्ष जो बायडेन यांनी यावर नाराजी व्यक्त केली असून हा लोकशाहीवरील हल्ला असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे लवकरच अमेरिका म्यानमारवर आर्थिक निर्बंध लावण्याची शक्यता आहे.


या प्रश्नावर संयुक्त राष्ट्र संघटनेनं चिंता व्यक्त केली असून त्या संदर्भात सुरक्षा परिषदेनं आज एक आपत्कालीन बैठक बोलावली आहे. लष्कराने सत्ता हातात घेताना राजधानी आणि इतर महत्वाच्या भागातील टेलिफोन आणि इंटरनेट सेवा बंद केल्या आहेत. तसेच सर्वात मोठं शहर असलेल्या यांगून या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.


'लस राष्ट्रवादा'मुळे जगाला मोठी किंमत चुकवावी लागेल- WHO अध्यक्ष


लोकशाही सरकार उलथवून लावणे आणि लष्कराची सत्ता प्रस्थापित करणे ही गोष्ट म्यानमारसाठी काही नवीन नाही . म्यानमारमध्ये या आधीही लष्कराची हुकुमशाही होती. त्या विरोधात प्रदीर्घ काळ लढा देऊन आंग सान सू ची यांनी लोकशाही मार्गाने सत्ता मिळवली होती. आता पुन्हा एकदा म्यानमारमध्ये लष्कराने सत्ता हाती घेतली आहे.


या सर्व घडामोडीवर भारताची बारीक नजर असल्याचं दिल्लीतील सूत्रांनी सांगितलंय. म्यानमारमध्ये लोकशाही नसणं हे भारतासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. तसेच त्या देशावर चीनचे वर्चस्व वाढण्याचीही शक्यता आहे.


Corona Vaccine | लस सिंगल डोसमध्ये 66 टक्के तर गंभीर आजारामध्ये 85 टक्के प्रभावी, जॉन्सन अॅन्ड जॉन्सन कंपनीचा दावा