तेल अवीव (इस्रायल): 26/11 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सुखरुप बचावलेला चिमुकला मोशे याची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट घेतली. यावेळी माशेने ‘पंतप्रधान मोदी आय लव्ह यू… माझं तुमच्यावर आणि भारतीयांवर प्रेम आहे.’ अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.


यावेळी पंतप्रधान मोदींनी मोशे आणि त्याच्या कुटुंबीयांना दीर्घकाळाचा व्हिसा देण्याचं जाहीर केलं. ‘तुला हवं तेव्हा तू भारतात येऊ शकतो.’ असं मोदी यावेळी मोशे याला म्हणाले. 2008 साली मुंबईतील छबाद हाऊसवर झालेल्या हल्ल्यामध्ये मोशेचे आई-बाबा रिवका आणि गॅव्रिएल होल्टझबर्ग मारले गेले होते.

काय घडलं होतं त्या काळरात्री?

अतिरेक्यांनी ज्या छबाद हाऊसवर हल्ला केला. त्याच इमारतीतून सहीसलामत बाहेर पडणाऱ्या मोजक्या लोकांपैकी एक आहेत. मोशे आणि सँड्रा...

बेबी मोशे आपले वडील गॅव्रिएल आणि आई रिवका यांच्यासोबत होता. अतिरेकी थेट इमारतीत घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. पहिल्याच हल्ल्यात मोशे अनाथ झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मात्या-पित्यांच्या मृतदेहासमोर बसून मोशे रडत होता. पण त्याचवेळी मोशेसाठी धावून आली त्याची केअरटेकर सँड्रा.

बेबी मोशेला आपल्या छातीशी कवटाळून सँड्रा लपून बसली. पण बाहेर गोळीबाराच्या फैरी झडतच होत्या. घमासान सुरुच होतं. एनएसजी गार्ड्स दाखल झाले आणि तब्बल 24 तासांच्या थरारानंतर या दोघांची सुटका झाली.

आई-वडिलांवरच्या अंत्यसंस्कारानंतर मोशे आजी आजोबांकडे इस्त्रायलला गेला. सोबत मोशेला वाचवणारी सँड्राही तिथेच स्थिरावली. मोशे आता इस्त्रायलचा नागरिक आहे. सँड्रालाही नागरिकता बहाल करण्यात आली आहे. दोघेही सुखात आहेत फक्त त्या काळरात्रीच्या आठवणी मनात साठवून...