मुंबई : जगातला सर्वात शक्तिशाली माणूस आणि मुंबईतल्या नालासोपाऱ्यात राहणाऱ्या सुरेश मुकुंदमध्ये काही कनेक्शन असू शकेल का? याचं उत्तर कोणालाही नाही असंच वाटेल, पण 29 वर्षांचा सुरेश चक्क अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शोची कोरिग्राफी करत आहे.
डान्सच्या सर्वात मोठ्या मुकाबल्यात ज्यानं झेंडा रोवला, क्रिकेटच्या ग्लॅमरस मंचावर ज्याने परफॉर्मन्स दिला, टेलिव्हिजनच्या रियालिटी शोमध्ये ज्याचं नाणं खणखणीत वाजवलं. ज्याचा डान्स आपण फिल्मी पडद्यावरही पाहिला, तोच तारा आता डोनाल्ड ट्रम्पच्या शपथविधी सोहळ्यामधल्या नृत्य सोहळ्याचं दिग्दर्शन करत आहे.
व्हाईट हाऊसच्या बाहेर सध्या दिवसरात्र सराव सुरु आहे... आणि या सरावाचा दिग्दर्शक आहे सुरेश मुकुंद... सुमारे 30 कलाकार बॉलिवुड गाण्यांवर ट्रम्प यांचं मनोरंजन करतील. मिस इंडिया मनस्वी ममगई या डान्स ट्रूपला लीड करणार आहे. सुरेश मुकुंदच्या या इंटरनॅशनल भरारीमुळे नालासोपाऱ्यात मात्र जल्लोष सुरु आहे.
2009 मध्ये बूगीवूगी, 2010 मध्ये एन्टरटएन्मेन्ट के लिये कुछ भी करेगा, 2011 मध्ये इंडियाज गॉट टॅलेन्ट असे अनेक खिताब सुरेशनं आपल्या खिशात घातले आहेत. पण सुरेशला पहिला इंटरनॅशनल ब्रेक मिळाला 2012 मध्ये
2015 साली मात्र सुरेशने आपला किंग्स युनायटेड इंडिया नावाचा ग्रुप सुरु केला आणि लक्ष्य होतं वर्ल्ड हिप हॉप चॅम्पियनशिप. सुरेशचा ग्रुप पहिल्याच प्रयत्नात फक्त फायनलमध्येच पोहोचला नाही, तर त्याने कांस्यपदकही नावावर केलं आणि तेव्हापासूनच अख्ख्या अमेरिकेची नजर सुरेशवर पडली.
जो कधीकाळी अमेरिकेत केवळ एक स्पर्धक होता... तोच अवघ्या 29 वर्षाचा सुरेश आज अमेरिकेला आपल्या तालावर नाचवणार आहे... जय हो, काला चश्मा, मुंड्या तू बच के रही, पॉप लेची पोरा अशा गाण्यांवर सुरेश सर्वांना थिरकायला लावणार आहे.
यूएस कॅपिटलच्या वेस्ट लॉनमध्ये होणाऱ्या या सोहळ्यामध्ये जगभरातले दिग्गज पाहुणे सुरेश मुकुंदच्या तालावर थिरकतील, तेव्हा ट्रम्प पुन्हा एकदा म्हणतील... आय लव्ह इंडिया