मुंबई : माऊण्टन बाईक रेसिंगच्या क्षेत्रामध्ये प्रख्यात असलेला क्रीडापटू कार्लिन ड्यूनच्या अपघाती मृत्यूमुळे जगभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शर्यत सुरु असताना अंतिम रेषा पार करण्यापूर्वी झालेल्या अपघातात कार्लिनला मृत्यूने गाठलं. वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी कार्लिनने जगाचा निरोप घेतला.
यूएसएतील कोलरॅडोमध्ये पाईक्स पीक इंटरनॅशनल हिल क्लाईंब स्पर्धा सुरु असताना रविवारी ही दुर्घटना घडली. अंतिम रेषेच्या दिशेने कूच करताना कार्लिनची 2019 Ducati Streetfighter V4 Prototype बाईक अपघातग्रस्त झाली. यामध्ये कार्लिनचा जागीच मृत्यू झाला.
ही स्पर्धा एकूण 12.42 मैल लांबीच्या टप्प्यात पार पडत असून त्यामध्ये 156 वळणांचा समावेश आहे. 9 हजार 390 फूट उंचीवर स्पर्धेला सुरुवात होते. तिथपासून डोंगराच्या 14 हजार 115 फूट उंचावरील अंतिम रेषेपर्यंत स्पर्धकांना प्रवास करावा लागतो.
कार्लिन या स्पर्धेचा गतविजेता होता. त्याने 2011, 2012 आणि 2013 अशा सलग तीन वर्षांसह गेल्या वेळी (2018) चौथ्यांदा ही स्पर्धा जिंकली होती. मात्र चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा रेसर पाचव्यांदा हा किताब जिंकण्यापूर्वीच काळाच्या पडद्याआड गेला. स्पोर्ट्स बाईकबाबत कार्लिनची पॅशन ही चाहत्यांसाठी चर्चेचा विषय होती.
2014 ते 2017 या कालावधीत बाईकिंगमधून ब्रेक घेऊन कार्लिनने आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवला होता. 'डस्ट ऑफ ग्लोरी 2' या कार्लिनच्या कारकीर्दीवर आधारित चित्रपटात त्यानेच भूमिका केली होती.
कार्लिनचे वडीलही व्यावसायिक बाईक रायडर होते. कार्लिनने आपल्या कारकीर्दीची सुरुवात बाईक सेल्समन म्हणून केली होती. 14 हजार फूटाच्या उंचीवर पोहचून रेस संपवण्याचा अनुभव शब्दात सांगण्यासारखा नाही, तो प्रत्यक्ष घेण्यासारखा आहे, असं कार्लिन म्हणायचा.
शर्यतीची अंतिम रेषा पार करण्यापूर्वी अपघात, रेसर कार्लिन ड्यूनचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jul 2019 10:51 PM (IST)
यूएसएतील कोलरॅडोमध्ये पाईक्स पीक इंटरनॅशनल हिल क्लाईंब स्पर्धा सुरु असताना बाईक रेसर कार्लिन ड्यूनचा अपघाती मृत्यू झाला
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -