Morocco Earthquake: मोरोक्कोतील विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या 2,800 च्या पार गेली आहे. देशाच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपात 2 हजार 262 नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. मोरोक्कोच्या (Morocco) मर्राकेशमध्ये (Marrakesh) शुक्रवारी (8 सप्टेंबर) 6.8 तीव्रतेचा भूकंप जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू मर्राकेशपासून 72 किलोमीटर अंतरावरील डोंगराळ भागात होता.
मोरोक्कोमधील भूकंपानंतर मदतकार्य सुरुच
मोरोक्कोमधील भूकंपानंतर मदतकार्याला वेग आला आहे. देशात बचावकार्य हे अजूनही देशात सुरुच आहे. भूकंपानंतर स्पेन, युनायटेड किंगडम आणि कतारची पथकं मदतकार्यासाठी धावून आली आहेत. शुक्रवारी पहाटे झालेल्या भूकंपाचा सर्वाधिक फटका दुर्गम भागाला बसल्याने तिथे बचाव पथकांना पोहोचण्यासाठी अडचणी येत होत्या.
देशात तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा
मोरोक्कोमधील भूकंपामुळे मर्राकेशपासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या पर्वतीय गावातील जवळपास प्रत्येक घर आणि इमारत उद्ध्वस्त झाली आहे. भूकंपात संपूर्ण गाव राख झालं आहे. बचाव पथकं दिवसरात्र ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. विविध देशांतील मदत पथकं देखील मोरोक्कोमध्ये कार्यरत आहेत.
या घटनेनंतर मोरोक्कोच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी (9 सप्टेंबर) देशात तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. मोरोक्कोचा राजा मोहम्मद सहावा यांनी सशस्त्र दलांना विशेष शोध आणि बचाव पथकं आणि सर्जिकल फील्ड हॉस्पिटल तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत, असं लष्कराच्या निवेदनात म्हटलं गेलं आहे.
पंतप्रधान मोदींकडून दु:ख व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) भूकंपात झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करत म्हटलं, "मोरोक्कोतील भूकंपाच्या दुर्घटनेबद्दल ऐकून दु:ख झालं. या दुःखाच्या वेळी माझे विचार मोरोक्कोच्या लोकांसोबत आहेत. ज्यांनी आपले प्रियजन गमावले त्यांच्याप्रती मी शोक व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावे, ही इच्छा. या कठीण काळात भारत मोरोक्कोला शक्य ती सर्व मदत करण्यास तयार आहे."
हेही वाचा:
UP Rain: उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा हैदोस; मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, 19 जणांचा मृत्यू