Chinese Defence Minister Missing: चीनमधून एक धक्कादायक माहिती समोर येत असून संरक्षणमंत्री ली शांगफू हे गेल्या दोन आठवड्यांपासून बेपत्ता असल्याची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियावर दावा गेला जात आहे की परराष्ट्र मंत्र्यानंतर आता संरक्षणमंत्रीही बेपत्ता झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ली शांगफू हे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेले नाहीत. त्यामुळे या चर्चांना बळ मिळत असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे शेजारचे राष्ट्र चीनमध्ये सर्व काही आलबेल नसून त्यामुळे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. 


या आधी चीनचे परराष्ट्र मंत्री बेपत्ता झाल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर चीनी सैन्याच्या शक्तीशाली रॉकेट फोर्सचा जनरल बेपत्ता झाला होता. आता थेट संरक्षणमंत्री बेपत्ता झाल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे चीनमध्ये काहीतरी गंभीर घडत असल्याचं चित्र आहे.


जपानमधील अमेरिकेचे राजदूत रहम इमॅन्युएल यांनी दावा केला आहे की चीनचे संरक्षण मंत्री गेल्या दोन आठवड्यांपासून सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत. X म्हणजे ट्विटर या सोशल मीडिया वेबसाइटवर त्यांनी आपली चिंता व्यक्त केली आहे. शी जिनपिंग यांनी संरक्षण मंत्र्यांसमोर सुरक्षा आणि स्थैर्याबाबत मुद्दे उपस्थित केले होते, असे याआधी चिनी वृत्तसंस्थेने म्हटले होते.


 






संरक्षण मंत्र्यांचे 29 ऑगस्ट रोजी शेवटचे दर्शन


हाँगकाँगमधील इंग्रजी दैनिक 'साउथ चायना मॉर्निंग पोस्ट' मध्ये आलेल्या वृत्तानुसार, चीनचे संरक्षणमंत्री शेवटचे 29 ऑगस्ट 2023 रोजी बीजिंगमध्ये झालेल्या चीन-आफ्रिका पीस अँड सिक्युरिटी फोरमच्या बैठकीत सहभागी झाले होते. तेव्हापासून चीनचे संरक्षण मंत्री सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत. याआधी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी जुलैमध्ये परराष्ट्रमंत्री किन गँग यांना अचानक हटवले होते. त्यानंतर त्यांच्या जागी वांग यी यांना परराष्ट्रमंत्री बनवल्याची बातमी समोर आली. चीनचे माजी परराष्ट्रमंत्री किन गँग यांना पदावरून हटवल्यापासून ते गायब असल्याची चर्चा सुरू आहे. 


मार्च 2023 मध्ये ली शांगफू यांची वेई फेंगे यांच्या जागी चीनचे नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कम्युनिस्ट पार्टी काँग्रेसमध्ये केंद्रीय लष्करी आयोगाचा राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे पूर्वीच्या चिनी संरक्षण मंत्र्यांप्रमाणे ली हे लष्करी कुटुंबातून आलेले आहेत. लींचे दिवंगत वडील ली शाओझू हे रेड आर्मीचे दिग्गज होते जे 1930 आणि 1940 च्या उत्तरार्धात जपानविरोधी युद्धात लढले. चीनमधील गृहयुद्ध आणि त्यानंतरच्या कोरियन युद्धादरम्यान लॉजिस्टिक रेल्वेच्या पुनर्बांधणीतील त्याच्या भूमिकेसाठीही ते ओळखले जात होते.


आता चीनमध्ये सुरू असलेल्या या राजकीय अस्थिरतेवर विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. स्वतः शी जिनपिंग आपल्या नेत्यांना हटवत आहेत की यामागे आणखी काही षडयंत्र आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. बीजिंग मध्ये तरी काय चालले आहे? याबाबत सध्या कोणालाच काही माहिती नाही.


ही बातमी वाचा: