सॅन फ्रान्सिस्को : सध्याच्या टेक्नोसॅव्ही युगात अनेकांना सेल्फीची सवय अनेकांना जडली आहे. पण एका माकडानेही स्वत:चा सेल्फी काढून त्याच्या कॉपीराईटसाठी न्यायालयीन लढाई लढत असल्याचं प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चांगलंच गाजत आहे. पण कोर्टात त्याची याचिका फेटाळून लावल्याने, न्यायालयीन लढाईत त्याचा पराभव झाला आहे.


वास्तविक, 2011 मध्ये इंडोनेशियाच्या जंगलात मकॉक प्रजातीमधील नारुतो नावाच्या माकडाने स्वत: चा सेल्फी काढल्याचा दावा करण्यात येत होता. या माकडाने न्यू साऊथ वेल्सच्या मोनमाउथशरमधील डेव्हिड स्टेलरच्या कॅमेऱ्यात स्वत: चा सेल्फी घेतला.

यानंतर या फोटोच्या कॉपीराईटवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. यात माकडाच्या वतीने पेटा या संस्थेने कोर्टात याचिका दाखल करुन, कॉपीराईटचा अधिकार माकडालाही दिला जावा अशी मागणी केली. पण न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावत, प्राण्यांना कॉपीराईटचा अधिकार देण्यास मनाई केली.

वास्तविक, या प्रकरणात सुरुवातीपासूनच नारुटोच्या लिंगावरुन अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पेटाचा दावा होता की, या फोटोतील माकड ही मादी जातीची आहे. तर फोटोग्राफर स्टेलरने नारुटो हा मॅकॉक प्रजातीमधील नर जातीचा माकड असल्याचं सांगितलं होतं.

दरम्यान, न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावल्याने, फोटोग्राफर डेव्हिड स्टेलरचा विजय झाला आहे. पण तरीही या फोटोच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्याचा 25 टक्के भाग देण्याची स्टेलरने तयारी दर्शवली आहे.

ही रक्कम नारुटो आणि त्याची निगा राखणाऱ्या संस्थेला दान करण्यात येणार आहे. स्टेलर आणि पेटा या दोघांनी एक संयुक्त प्रेस रिलीज प्रकाशित करुन याबाबतची माहिती दिली.

या प्रकरणावर पेटाचे वकील जेफ कर्र यांनी सांगितलं की, या याचिकेमुळे जगभरात प्राण्यांच्या अधिकाराबाबत चर्चा झाली.  तर फोटोग्राफर स्टेलरने सांगितलं की, मी स्वत: संरक्षणवादी आहे. फोटोमध्ये आवड वाढल्याने इंडोनेशियातील प्राण्यांना त्याचा फायदा झाला.