जकार्ता : संतप्त जमावाने तब्बल 300 मगरींना मारल्याची धक्कादायक घटना इंडोनेशियात घडली. तेथील एका मगरीने केलेल्या हल्लात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याच रागातून जमावाने मगरींना लक्ष्य केल्याचं प्रशासनाने सांगितलं आहे.


इंडोनेशियामधील पापुआ प्रांतातील एक व्यक्ती आपल्या पशूंना चारा आणण्यासाठी गेला असता शेतातील मगरीने त्याच्यावर हल्ला केला. मगरीच्या या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या शेतात शेकडोंच्या संख्येने मगरी होत्या.

मगरीच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या 48 वर्षीय व्यक्तीचं नाव सुगितो असं होतं. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी  अगोदर पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर ज्या व्यक्तीच्या शेतातील मगरीने हल्लात त्या व्यक्तीने जबाबदारी घेत मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना भरपाई देण्याचं कबूल केलं.

शेकडोच्या संख्येत असलेल्या जमावाचं एवढ्याने समाधान झालं नाही. या जमावाने शस्त्रांसह त्या शेतातील मगरींवर हल्ला केला. सूडाने पेटलेल्या जमावाने जवळपास 300 मगरींना संपवलं. यामध्ये चार इंचाच्या लहान पिल्लांपासून ते दोन मीटरपर्यंतच्या मोठ्या मगरींचा समावेश होता.

‘आम्ही मोठ्या संख्येत असणाऱ्या जमावाला रोखू शकलो नाही, पण त्यांच्यावर आता नक्कीच कारवाई करणार आहोत,’ असं पोलिसांनी म्हटलं आहे.