अंकारा : भूतकाळात सोशल मीडियावर व्यक्त केलेली मतं तुमचं भविष्य पालटण्यासाठी कशी कारणीभूत ठरु शकतात, याचं उदाहरण तुर्कीमध्ये पाहायला मिळालं आहे. काही महिन्यांपूर्वी केलेल्या ट्वीटमध्ये पिरीएड्समधील रक्ताची तुलना शहीद जवानांनी वाहिलेल्या रक्ताशी केल्यामुळे 'मिस तुर्की'चा किताब काढून घेण्यात आला.
इतिर एसेन या 18 वर्षीय तरुणीच्या डोक्यावर मिस तुर्कीचा मुकूट ठेवण्यात आला. मात्र तिचा आनंद फार काळ टिकला नाही. तिने केलेला जुना ट्वीट स्पर्धेच्या आयोजकांच्या समोर आला. हा ट्वीट अस्वीकार्य असल्याचं मत व्यक्त करत काही तासातच तिचा किताब मागे घेण्याची घोषणा करण्यात आली.
तुर्कस्तानात झालेल्या सत्ताबदलाच्या प्रयत्नाचा 15 जुलै रोजी पहिला वर्धापन दिन होता. गेल्या वर्षी सत्ताबदलाचा प्रयत्न झाला, तेव्हा सैनिकांशी लढताना सुमारे 250 जणांना प्राण गमवावे लागले होते. वर्धापन दिली इतिरने केलेल्या ट्वीटमध्ये मासिक पाळीतील रक्ताची तुलना शहिदांनी वाहिलेल्या रक्ताशी केली.
काय होतं ट्वीट?
'15 जुलै. शहीद दिनाच्या सकाळी मला पिरीएड्स आले आहेत. मी प्रतिकात्मकरित्या आपल्या शहिदांचं रक्त वाहून हा दिवस साजरा करत आहे' असं इतिरने लिहिलं होतं. आपण राजकारणातील तज्ज्ञ नाही, आपण राजकारणही करत नव्हतो, असं तिने इन्स्टाग्रामवर लिहिलं.
'मिस तुर्की संघटनेकडून अशा प्रकारच्या ट्वीट्सना प्रोत्साहन देण्याची शक्यताच नाही. जगात देशाची प्रतिमा उंचावण्याचं काम मिस तुर्की करते.' असं सांगत आयोजकांनी इतिरचा किताब परत घेतला. इतिर ऐवजी रनर अप ठरलेली अस्ली सुमेन चीनमध्ये होणाऱ्या मिस वर्ल्ड स्पर्धेत तुर्कस्थानाचं प्रतिनिधीत्व करेल.