केप टाऊन : कोणत्याही देशातील,खंडातील किंवा जागतिक सौंदर्य स्पर्धा जिंकणे हे कोट्यवधी तरुणींचे स्वप्न असते. मिस इंडिया, मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स, मिस एशिया,मिस आफ्रिकासारखी स्पर्धा जिंकून मुकुट परिधान करण्याचा आनंद निराळाच. डॉर्कस कॅसिन्डे या तरुणीचे नाव मिस आफ्रिका स्पर्धेची विजेती म्हणून घोषित केल्यानंतरचा तिचा आनंद काही क्षणच टिकला. मिस आफ्रिकेचा मुकुट परिधान करण्यापूर्वी तिच्या केसांना आग लागून तिच्यासह उपस्थितांना मोठा धक्का बसला.

डॉर्कस कॅसिन्डे या मॉडेलने मिस आफ्रिका 2018 ही स्पर्धा जिंकली. मिस आफ्रिकेसाठी तिचे नाव घोषित केल्यानंतर ती व्यासपीठावर आली. त्यानंतर आतिषबाजी सुरु झाली. या आतषबाजीत मिस आफ्रिकेच्या केसांना आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत डॉर्कस थोडक्यात बचावली.

डॉर्कसच्या केसांना आग लागल्यानंतर आयोजकांनी ती आग त्वरित विझवली आणि तिला स्टेजवरुन बाजूला नेले. धक्क्यातून सावरल्यानंतर तिला मुकुट घालण्यात आला. डॉर्कस ही नायजेरियन मॉडेल अवघ्या 24 वर्षांची आहे.