लंडन : संयुक्त राष्ट्रसंघाच्या अनेक कार्यांमध्ये सक्रीय सहभाग दर्शविणारी हॉलिवूडची प्रख्यात अभिनेत्री अँजेलिना जोलीने भविष्यात राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. अँजेलिना यापूर्वीच समाजकार्य करीत असल्याने जगभर त्यासाठीही ओळखली जात होती. आता तिने युद्धातील शरणार्थी आणि महिलांची मदत करण्याचे आवाहन जगभरातील नेत्यांना केले आहे.

अँजेलिना संयुक्त राष्ट्रसंघासाठी शरणार्थी लोकांबाबतची दूत म्हणून काम करते. हॉलिवूडमधील अभिनेत्रींच्या लैंगिक शोषणाविरुद्धच्या मोहिमेतही ती सहभागी झाली होती. एका मुलाखतीत तिने आपण आता राजकीय क्षेत्रातही येऊ शकतो, असे संकेत दिले.

बीबीसी टुडेमध्ये अतिथी संपादक म्हणून पोहोचलेल्या अँजेलिनाने अनेक विषयांवर मन मोकळे केले. 20 वर्षांपूर्वी राजकारणाबद्दल प्रश्न विचारला गेला असता तर मी हसून नकार दिला असता. परंतु राजकारणात माझी गरज आहे का किंवा मी तिथे जाईन का या प्रश्नांची उत्तरे सध्या तरी माझ्याकडे नाहीत. राजकारणासाठी मी योग्य आहे की नाही हे देखील मला माहिती नाही. परंतु माझ्यात याबद्दलची प्रतिभा असल्यास मी याकरिता तयार आहे. मी कोणत्याही प्रकारच्या आव्हानासाठी पूर्णपणे तयार असल्याचे अँजेलिनाने म्हटले आहे.

सरकारसोबत काम करायला मी सक्षम आहे तसंच लष्करासोबत काम करायलाही मी सक्षम आहे. त्यामुळे खूप काही करता येईल, अशा जागेवर सध्या मी बसली आहे, असेही अँजेलिनाने म्हटले आहे. आताच तुम्ही राजकारणात प्रवेश करणार का, या प्रश्नावर मात्र तिनं शांत राहणं पसंत केलं. डेमोक्रेटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असणाऱ्या 30 ते 40 जणांच्या यादीत तू असणार? असं विचारल्यानंतर तिनं फक्त 'धन्यवाद' असं उत्तर दिलं.