Migrant boat capsizes in English Channel : फ्रान्समधून ब्रिटनमध्ये जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या 31 निर्वासितांचा बुडून मृत्यू झाला. हे निर्वासित इंग्लिश खाडीतून प्रवास करत होते. त्या दरम्यान त्यांची बोट उलटली. ही दु:खद मोठी घटना असल्याचे फ्रान्सच्या गृहमंत्र्यांनी म्हटले. 


निर्वासितांच्या बोटीला अपघात झाल्यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपात्कालीन बैठक बोलावली. या घटनेची माहिती मिळताच, कॅलेस बंदरावर पोलीस, रुग्णवाहिका आणि आपात्कालीन सेवा दाखल करण्यात आल्या. तर, गृहमंत्री जेराल्ड दरमानिन यांनी सांगितले की, या बोटीत 34 जण होते. त्यातील 31 जणांचे मृतदेह आढळले असून दोन जण जिवंत  आहेत. तर, एक जण बेपत्ता आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत फ्रान्स आणि ब्रिटनकडून संयुक्तपणे मदत आणि बचाव कार्य सुरू होते. 


या घटनेप्रकरणी चार संशयित मानवी तस्करांना बुधवारी अटक करण्यात आली असल्याची माहिती फ्रान्स सरकारकडून देण्यात आली. नौकेतील निर्वासित प्रवासी कोणत्या देशातील होते, याची माहिती देण्यात आली नाही. 


बोटीत क्षमतेपेक्षा अधिक लोक


मच्छिमारांनी दिलेल्या माहितीनुसार, शांत असलेल्या समु्द्राचा फायदा घेण्यासाठी ब्रिटनला जाणाऱ्या निर्वासितांची संख्या अधिक होती. बोटीत क्षमतेपेक्षा अधिक जण असल्याचा दावा करण्यात येत आहे. एका मच्छिमाराला अपघातग्रस्त बोट दिसली. या बोटीच्या भोवती काही लोकं दिसली. मात्र, त्यांच्या शरिराची हालचाल दिसून आली नाही.


मध्यपूर्वे भागातील देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सातत्याने सुरक्षित निवाऱ्यासाठी स्थलांतर वाढत आहे. अनेक युरोपीयन देशांमध्ये स्थलांतरितांची संख्या वाढत आहे. यामध्ये बहुसंख्येने मुस्लिम धर्मीयांची संख्या अधिक आहे.   


 इतर महत्त्वाच्या बातम्या:


Sweden First Female PM : स्वीडनच्या पहिल्या महिला पंतप्रधानांचा नियुक्तीनंतर काही तासांनी राजीनामा, नक्की काय घडलं?


आर्क्टिक समुद्रात 'ट्रॅफिक जाम'; 11 इंच बर्फात अडकले 24 जहाज, रशियाला झटका


भारतीय नौदलात 'आयएनएस वेला' पाणबुडीचा समावेश; पाकिस्तान-चीनवर राहणार नजर