Mexico Bus Accident : मेक्सिकोमध्ये बस 80 फूट खोल दरीत कोसळून भीषण बस अपघात झाला आहे. या बस अपघातात 29 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर, 19 जण जखमी झाले आहेत. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी पहाटे दक्षिण मेक्सिकोमध्ये बस दरीत कोसळली. या अपघातात 29 लोक ठार आणि इतर 19 जखमी झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दक्षिणेकडील ओक्साका राज्यात बुधवारी हा भीषण अपघात झाला आहे. 


मेक्सिकोमध्ये भीषण बस अपघात


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेक्सिकोच्या दक्षिणेकडील ओक्साका राज्यात बुधवारी प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. प्रांतीय वाहतूक पोलिसांनी ट्विट करत सांगितलं आहे की, बस मेक्सिको सिटीहून ओक्साका शहराकडे जात होती. मीडिया रिपोर्टनुसार, अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, 29 लोकांचा मृत्यू झाला आणि 19 जखमींना उपचारांसाठी प्रदेशातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताच्या कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून त्याचा तपास सुरू आहे. दरम्यान, हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 






बस 80 फूट खोल दरीत कोसळून 29 जणांचा मृत्यू


ओक्साकाच्या राज्यपाल सॉलोमन यांनी ट्विट करून अपघाताची माहिती दिली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. रहिवासी आणि पालिका कर्मचाऱ्यांनीही घटनास्थळी बचावकार्यात मदत केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये एक वर्षाचं बालक, 13 महिलांचा समावेश आहे.


चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची शक्यता


जीसस रोमेरो यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, 'स्थानिक वाहतूक कंपनीची बस मंगळवारी रात्री राजधानी मेक्सिको सिटी (Mexico City) येथून सॅंटियागो डी योसुंडुआ (Santiago De Yosondua)  शहराकडे निघाली होती. दुर्दैवाने ही बस 25 मीटर (80 फूट) खोल दरीत कोसळली. वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.'


राज्यपालांनी व्यक्त केलं दु:ख


ओक्साकाचे राज्यपाल सॉलोमन यांनी या भीषण अपघाताबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. राज्यपालांनी विविध यंत्रणांना घटनास्थळी जाऊन पीडितांना मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यपालांनी प्रशासन, आरोग्य, सार्वजनिक सुरक्षा, कल्याण आणि इतर विभागांच्या सचिवांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. राज्यपालांनी ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे.