स्प्रिंग 2019 मध्ये राजघराण्यात पाळणा हलणार आहे. सध्या जोडपं म्हणून दोघं पहिल्यांदाच रॉयल ट्रीपवर ऑस्ट्रेलियाला गेले आहेत. हॅरी हे ड्यूक ऑफ ससेक्स, तर मेगन मार्कल या हर रॉयल हायनेस द डचेस ऑफ ससेक्स म्हणून ओळखले जातात. ब्रिटनच्या राजघराण्यातील नवा पाहुणा क्वीन एलिझाबेथ यांचं सातवं पतवंडं असेल.
प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनीही दोघांचं अभिनंदन केलं आहे.
प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांचं रॉयल वेडिंग लंडनमधील सेंट जॉर्ज चॅपेलमध्ये 19 मे रोजी झालं होतं. प्रिन्स हॅरी हे दिवंगत प्रिन्सेस डायना आणि प्रिन्स चार्ल्स यांचे धाकटे पुत्र, तर क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांचे नातू आहेत.
मेगन मार्कलने लग्नापूर्वी टीव्ही आणि चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. सुट्स, फ्रिंज, सीएसआय : मायामी, नाईट रायडर अँड कॅसल सारख्या टीव्ही सीरिज, हॉरिबल बॉसेस सारख्या चित्रपटात ती झळकली आहे.
केंब्रिजचे ड्यूक आणि डचेस अर्थात प्रिन्स हॅरी यांचे ज्येष्ठ बंधू प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन यांना 4 वर्षांचा प्रिन्स जॉर्ज, 2 वर्षांची प्रिन्सेस शार्लेट आणि 6 महिन्यांचा प्रिन्स ल्युईस ही तीन अपत्यं आहेत.