रिओ दि जेनेरिओ : ब्राझिलच्या रिओ दि जेनेरिओमधील राष्ट्रीय संग्रहालयाला रविवारी (2 सप्टेंबर) भीषण आग लागली. या आगीत दोन कोटींहून जास्त ऐतिहासिक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. यात मानवी इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या गोष्टीही होत्या. त्यामुळे जगभरातून या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. सुदैवाने, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या संग्रहालयाच्या इमारतीत पूर्वी पोर्तुगालचे शाही घराणेही राहत असे. यंदा म्हणजे 2018 च्या सुरुवातीलाच या इमारतीला 200 वर्षे पूर्ण झाली होती. विज्ञान, इतिहास आणि संस्कृती यातील कोणतेही सखोल संशोधन या संग्रहालयाच्या मदतीशिवाय पूर्ण होणं शक्य नव्हते. इतके महत्त्वाचे संदर्भ इथे जपून ठेवण्यात आले होते.

संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी इमारत असलेल्या या संग्रहालयात 12 हजार वर्षांपूर्वीचा मानवी सांगाडाही होता. शिवाय, डायनासॉरच्या हाडांचा सांगाडाही इथे जपून ठेवण्यात आला होता. लॅटिन अमेरिकेतील उत्खननादरम्यान हा सांगाडा सापडला होता, तो याच संग्रहालयात ठेवण्यात आला होता. या आगीत तो सांगाडाही बेचिराख झाला आहे.

ब्राझिलचे राष्ट्रपती मिशल टेमेर यांनी ट्वीट करुन या दुर्घटनेबाबत म्हटले की, "ही दुर्घटना ब्राझिलवासियांसाठी अत्यंत दु:खद आहे. आगीत कुणाला दुखापत झालीय की नाही, हे अद्याप कळू शकले नाही. शिवाय आगीचं कारणही समजू शकले नाही."