कराची : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एक्स्प्रेस ट्रेनला लागलेल्या आगीत 65 जणांना होळपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रहीम यार खान जिल्ह्याच्या लियाकतपूर शहरात कराची-रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसला आज सकाळी आग लागली. आगीत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अनेकजण गंभीर असल्याने मृत्यांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.
पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कराची-रावळपिंडी हा लांबचा प्रवास असल्याने काही प्रवासी आपल्यासोबत स्वयंपाक करण्यासाठी छोटे गॅस स्टोव्ह घेऊन जात होते. दरम्यान काहींनी गॅस स्टोव्हवर स्वयंपाक बनवण्यास सुरुवात केली. ट्रेन वेगात असताना गॅस स्टोव्हचा स्फोट झाला. ट्रेनमध्ये ज्वलनशील वस्तू घेऊन जाणे गुन्हा असून देखील गॅस स्टोव्ह नेल्याने ही घटना घडली. आगीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वेगाने बचावकार्य सुरु केलं.
ट्रेनमध्ये स्फोट झाल्यानंतर गाडी वेगात असल्याने काही वेळातच आगीने रौद्र रुप धारण केलं. प्रवाशांना काही समजण्याच्या आत आग गाडीच्या तीन डब्ब्यांमध्ये पसरली. यामध्ये 65 प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी आहेत. आग लागल्यानंतर काही जणांनी धावत्या गाडीत बाहेर उड्या मारल्या त्यामुळेही काहींचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.