न्यूयॉर्क : राज्यातील मराठा क्रांती मूक मोर्चाचं वादळ आज थेट सातासमुद्रापार घोंगावत आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील ऐतिहासिक 'टाईम्स स्क्वेअर'वर मराठा मूक मोर्चा निघाला आहे.


भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी हा मोर्चा निघाला. न्यूयॉर्क, न्यूजर्सी आणि कनेक्टीकट या तीन राज्यांतील सकल मराठा समाज उत्स्फूर्तपणे या मोर्चात सहभागी झाला. कोपर्डी प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवा, अॅट्रॉसिटी कायद्याची समीक्षा करा, शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्या या मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या आहेत.

न्यूयॉर्क, न्यूजर्सी व कनेक्टीकट या तीन राज्यांतील आठ युवतींतर्फे निवेदन सादर करण्यात आलं. न्यूयॉर्कचे सिनेटर चक शुमर आणि भारताचे संयुक्त राष्ट्रांतील दूत सय्यद अकबरुद्दीन यांना हे निवेदन देण्यात आलं. याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना ई-मेल द्वारे हे निवेदन पाठवण्यात आलं.

भारताच्या न्यूयॉर्कमधील राजदूत श्रीमती दास यांना प्रत्यक्ष भेटून हे निवेदन सादर करण्यात येणार आहे. या आंदोलनाची भारतीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी कुतूहलाने माहिती घेत अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे.

दरम्यान येत्या काही दिवसांत कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, कोलोरॅडो, विस्कॉन्सिन व वॉशिंग्टन येथेही मराठा मूक मोर्चांचं नियोजन केलं जाणा आहे.