Man Who Saved Imran Khan : पाकिस्तानमध्ये ( Pakistan ) माजी पंतप्रधान इम्रान खान ( Imran Khan ) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. हल्लेखोराने इम्रान खान यांच्यावर गोळीबार केला. पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर पंजाब प्रांतातील रॅलीदरम्यान गोळीबार झाला. गोळीबारात इम्रान खान यांना एक गोळी लागली. या हल्ल्यावेळी एका तरुणाच्या चपळाईमुळे इम्रान खान यांचा जीव वाचला. हल्लेखोराने इम्रान खान यांच्यावर गोळीबार सुरू केला, त्यावेळी गर्दीत उभा असलेला एक समर्थक देवदूताप्रमाणे इम्रान यांच्या मदतीला धावून आला. हल्लेखोर गोळीबार करत असताना, या व्यक्तीने मागून त्याची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे हल्लेखोराचा नेम चुकला आणि इम्रान यांच्या पायाल गोळी लागली. यानंतरही हल्लेखोराने निसटून जाण्याचा प्रयत्न केला पण या तरुणाने हल्लेखोराला पकडण्यासाठी धाव घेतली आणि त्याला पकडलं.
तरुणाच्या चपळाईमुळे इम्रान खान यांचा जीव वाचला
पाकिस्तानी वृत्तवहिनी एआरवाय न्यूजनुसार ( ARY News ), इम्रान खान इतर नेत्यांसोबत कंटेनरवर उभे होते, त्यावेळी हल्लेखोराने त्याच कंटेनरवर त्यावर गोळीबार केला. मात्र, गोळीबारादरम्यान इम्रान खानच्या एका समर्थकाने बंदूकधारी हल्लेखोराचा हात पकडला. या तरुणाने स्वत:च्या जीवावर उदार होत हल्लेखोराचा पकडलं. त्यामुळे हल्लेखोराचं लक्ष्य चुकलं आणि इम्रान खान बचावले. हल्लेखोराचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या या तरुणाला इम्रान खान यांच्या इतर समर्थकांनी आपल्या खांद्यावर उचलून घेतं त्याचं कौतुक केलं.
तरुणाने बंदूकधारी हल्लेखोराचा हात पकडला
इम्रान खान यांच्या समर्थकांनी हल्लेखोराला पकडणाऱ्या या तरुणाला देवदूत म्हटलं आहे. या तरुणाने जीवाची पर्वा न करता इम्रान खान यांचा जीव वाचवला. या व्यक्तीचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होत आहे. इम्रान खान यांचे समर्थक तरुणाचे कौतुक करत आहेत. इम्रान खान समर्थकांनी या व्यक्तीला खांद्यावर उचलूनही घेतलं होतं.
गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू
इम्रान खान यांच्या हत्येचा कट हाणून पाडणाऱ्या या तरुणाने एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'मी इम्रान खान यांच्याकडे पाहत होतो, तेव्हा मी हल्लेखोराला बंदूक लोड करताना पाहिले. त्यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना लक्ष्य करत गोळी झाडली पण त्यावेळी मी त्यांचा हात धरून बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला.' या व्यक्तीने पुढे सांगितलं की, 'बंदूक हिसकावण्याचा प्रयत्नात असताना हल्लेखोराकडून गोळीबार सुरुच होता. या गोळीबारात त्याच्या समोर असलेल्या एका व्यक्तीला गोळी लागली. गोळीबारानंतर झालेल्या गोंधळात त्याने बंदूक फेकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, मी काही लोकांच्या मदतीने आम्ही आरोपीला पकडलं.'