ह्यूस्टन : अमेरिकेत एका व्यक्तीने आपली अटक टाळण्यासाठी पोलिसांच्याच कुत्राचा चावा घेतला. न्यू हॅम्पशायरमधील ही घटना असून, या व्यक्तीला गेल्या आठवड्यात अटक करण्यात येत होती. पण ही अटक टाळण्यासाठी त्याने पोलिसांच्या कुत्र्याचा चावा घेतला.
अधिक माहितीनुसार, ही घटना रविवारची असून, एका व्यक्तीवर गोळीबार झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बॉस्कवेनमधील एका इमारतीला घेरलं. पण गोळीबार करणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना गुंगारा देत तिथून पळ काढला.
यानंतर त्याने लपण्यासाठी एका कपड्याच्या ढिगाऱ्याचा आधार घेतला. पण त्याचा माग काढत त्याच्या मागे धावणाऱ्या पोलिसांच्या कुत्र्याने कपड्याच्या ढिगाऱ्यात लपलेल्या कुत्र्याच्या जवळ जाऊन भुंकण्यास सुरुवात केली. यामुळे गोळीबार करणाऱ्या व्यक्तीने त्याचाच चावा घेतला. विशेष म्हणजे, यानंतर कुत्र्यानेही त्याचा चावा घेतला.
न्यू हॅम्पशर केनाइन ट्रूपर्स असोसिएशनने ही घटना आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केली आहे. त्या माहितीनुसार, एका व्यक्तीवर अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेताच, तिथून दोघांनी पळ काढला. यातील एका व्यक्तीने पोलिस पथकातील डॉग K-9 वेडा या कुत्र्याचाच चावा घेतला.