Maldives New President Mohammed Muizzu : मालदीवमध्ये मोहम्मद मुइज्जू (Mohammed Muizzu) यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शानदार विजय मिळवला आहे. मालदीवचे नवे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू चीन समर्थक (China Supporter) असून त्यांनी विजयानंतर भारताविरोधात वक्तव्य (India) करत चीनसोबतचे घनिष्ट संबंध दाखलून दिले आहेत. चीन समर्थक मोहम्मद मुइज्जू मालदीवचे राष्ट्रपती बनल्याने भारताची डोकेदुखी वाढली आहे. विजयानंतरच्या भाषणात त्यांचं चीनच्या बाजूने असलेलं झुकत माप असल्याचं स्पष्ट झालं आहे. मोहम्मद मुइज्जू यांनी त्यांच्या भाषणात मालदीवमधून भारतीय सेना हटवण्याबाबत पुन्हा एकदा वक्तव्य केलं आहे.


मालदीवचे नवे राष्ट्रपती चीन समर्थक


मालदीवमध्ये चीन समर्थक नेते मोहम्मद मुइज्जू यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकली आहे. मालदीवमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी मोहम्मद मुइज्जू यांनी 53 टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवून शानदार विजय मिळवला. चीनचे समर्थक मानले जाणारे मुइझ्झू यांनी या निवडणुकीत प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीवचे (PPM) उमेदवार आणि भारत समर्थक विद्यमान राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचा पराभव केला.


चीन समर्थक राष्ट्रपती भारतासाठी डोकेदुखी


मोहम्मद मुइज्जू यांनी पहिल्याच भाषणात 'इंडिया आऊट'चा नारा दिला आहे. मुइज्जू यांनी प्रचारादरम्यानही 'इंडिया आऊट'चा नारा दिला होता. मुइज्जू चीने समर्थक असल्याचं मानलं जातं. ते याआधी माले शहराचे आमदार होते. मुइज्जू यांची वक्तव्य नेहमी चीनच्या बाजूने असल्याचं पाहायला मिळतं. चीनसोबतचे संबंध अधिक मजबूत करण्यावर त्यांचा भर आहे. 


पंतप्रधान मोदींकडून मुइज्जू यांचं अभिनंदन


दरम्यान, मालदीवच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुइज्जू यांचं सोशल अभिनंदन केलं आहे. त्यांनी X वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "भारत-मालदीव द्विपक्षीय संबंध वेळोवेळी बळकट करण्यासाठी आणि हिंदी महासागर क्षेत्रात आमचे एकूण सहकार्य वाढवण्यासाठी भारत वचनबद्ध आहे."




मालदीवमधून परदेशी सैनिक हटवणार


मुइज्जू यांनी निवडणुकीच्या प्रचारातील भाषणादरम्यान, मुइज्जूने सोलिह सरकारवर अनेक आरोप केले होते. भारताने मालदीवच्या सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्यात हस्तक्षेप केला आहे, असंही मुइज्जू यांनी म्हटलं होतं. निवडणूक जिंकल्यानंतरच्या भाषणात मुइज्जू म्हणाले की, देशवासीयांच्या इच्छेविरुद्ध कोणतेही विदेशी सैन्य मालदीवमध्ये राहणार नाही. राष्ट्रपती पदभाराच्या पहिल्याच दिवसापासून ते परदेशी सैन्य हटवण्याचे प्रयत्न सुरू करतील. यासाठी जनतेनं आपल्याला मतदान केलं आहे, त्यामुळे आपण आपल्या वचनावर ठाम राहणार असल्याचे मुइज्जू यांनी म्हटलं आहे.


मुइज्जू यांचे सोलिह यांच्यावर आरोप


मालदीवचे माजी राष्ट्रपती सोलिह यांची 2018 मध्ये राष्ट्रपती पदी निवड झाली होती. भारताला मालदीवमध्ये आपल्या इच्छेनुसार वागण्याचं स्वातंत्र्य दिल्याचा आरोप मुइज्जू यांनी सोलिह यांच्यावर आरोप केला होता. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यास मालदीवमधून भारतीय सैन्य हटवून देशाचे व्यापारी संबंध संतुलित ठेवू, असं आश्वासन मुइज्जू यांनी जनतेला दिलं होतं. त्यावेळी, सोलिह यांनी स्पष्ट केलं होतं की, मालदीवमध्ये भारतीय सैन्याची उपस्थिती केवळ दोन सरकारांमधील करारानुसार डॉकयार्ड बांधण्यासाठी होती आणि भारत आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणार नाही.