सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात समोर आलेल्या नावांमध्ये अभिनेते, राजकीय नेते आणि प्रतिष्ठित व्यक्ती असण्याची शक्यता आहे. या सीडीआरचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी झाला असल्याचा संशय पोलिसांना आहे.
ठाणे गुन्हे शाखेने कॉल डिटेल रेकॉर्डच्या खरेदी-विक्री प्रकरणात देशातील पहिली महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक केल्यानंतर मोठं रॅकेट समोर आले. पोलिसांनी आतापर्यंत रजनी पंडित यांच्यासोबत इतर 4 जणांना अटक केली आहे. आतापर्यंत 7 मोबाईल कंपन्या, 4 विमा कंपन्या चौकशीच्या घेऱ्यात आहेत.
आरोपी सीडीआरचा वापर केवळ हेरगिरीसाठीच नव्हे, तर ब्लॅकमेलिंगसाठीही वापरत होते, अशी माहितीही आरोपींच्या चौकशीत समोर आली आहे.
16 व्हीआयपी व्यक्तींच्या नंबरची यादी पोलिसांच्या हाती लागली आहे. या व्हीआयपी नंबरचे सीडीआर आरोपींनी पैसे देऊन मिळवले होते. या नंबरचे सीडीआर नेमके कोणत्या कारणासाठी मिळवले गेले, याचं स्पष्ट उत्तर अद्याप कोणत्याही आरोपीने दिले नाही.
लॅपटॉप आणि मोबाईलमधील माहितीच्या आधारावर सीडीआर मागणाऱ्यांची चौकशी केली जात आहे. अधिकृत मेलचीही चौकशी केली जात आहे. अनेक आरोपी वॉन्टेड आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिस इतर आरोपींना अटक करण्यासाठी धावपळ करत आहेत.