मुंबई : नोबेल पारितोषिक विजेती पाकिस्तानी समाजसेविका मलाला युसुफझाईची संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतिदूतपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाकडून देण्यात येणारा हा सर्वोच्च सन्मान आहे. संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनिओ गुटेरेस यांनी मलालाच्या नावाची अधिकृतरित्या घोषणा केली आहे.दरम्यान 19 वर्षीय मलाला युसुफझाईला सर्वात कमी वयाची शांतिदूत होण्याचा मान मिळाला आहे.
2012 मध्ये पाकिस्तानात शिक्षणाचा प्रसार केल्यामुळे मलाला युसुफझाईला तालिबानी दहशतवाद्यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानात शिक्षणाचा प्रसार थांबवा असे त्यांनी तिला वेळोवेळी सांगितले होते. परंतु मलालाने त्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा आपले शिक्षण प्रसाराचे कार्य सुरू ठेवले. त्याची दखल घेत मलालाला हा सन्मान देण्यात आला आहे.
पाकिस्तानात सध्या महिला शिक्षणाचा प्रचार, प्रसार करणाऱ्या मलाला युसुफजाईला 2013 चा मानवाधिकार पुरस्कारही देण्यात आला आहे. मानवाधिकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांच्या गौरवासाठी दर पाच वर्षांनंतर या संयुक्त राष्ट्र संघातर्फे या पुरस्कारांचे वितरण केले जाते.