लंडन : पाकिस्तानात लहान मुलांच्या शिक्षणासाठी काम करणारी, नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसूफझाई आता पदवीधर झाली आहे. मलालाने ऑक्सफोर्ड विद्यापीठातून तत्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या तीन विषयात पदवी प्राप्त केली आहे. याबद्दल तिने स्वत: सोशल मीडियावर माहिती दिली आहे.


यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रानं मलालाचं कौतुक केलं आहे. प्रियांकानं मलालासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यात "हॅप्पी ग्रेजुएशन, मलाला! तू तत्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रातून ऑक्सफोर्डमधून डिग्री घेतलीस, हे मोठं यश आहे. मला खूप गर्व वाटतोय, असं प्रियांकानं म्हटलं आहे.



मलालाने ट्विटरवर दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने आपल्या कुटुंबासमवेत सेलिब्रेशन करताना आणि आपल्या भविष्यात काय करायचे आहे, यासंदर्भात खुलासा केला आहे. तर दुसऱ्या एका फोटोत पदवीनंतर विद्यापीठात केलेल्या जल्लोष दिसून येतोय.



मलाला युसूफझाई आपल्या ट्वीटमध्ये म्हणतेय की, 'मी ऑक्सफोर्डमधून मी तत्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी मिळवली. याबद्दल मला खूप आनंद झाला आहे. पुढे काय आहे हे मला माहिती नाही. आतासाठी नेटफ्लिक्स, वाचन आणि झोप हा नित्यक्रम राहणार आहे.'


मलालाला तालिबानी दहशतवाद्यांनी 2012 मध्ये तिला यापूर्वी जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. मलाला पाकिस्तानातील महिला आणि लहान मुलींच्या शिक्षणांदर्भात काम करत असल्याने, तालिबानी दहशतवाद्यांनी तिच्यावर ऑक्टोबर 2012 मध्ये हल्ला चढवला होता. या हल्ल्यात मलालाच्या डोक्याला दुखापत झाली होती. तिच्या डोक्याला गोळी चाटून गेली होती. तिच्यावर लंडनमध्ये उपचार करण्यात आले. या हल्लाचा जगभरातून निषेध करण्यात आला होता. मुस्लिम महिलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या मलालाला 2014 मध्ये शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.