पॅरिस : फ्रान्सच्या नव्या राष्ट्राध्यक्षांची निवड करण्यासाठी रविवारी पहिल्या फेरीच्या निवडणुका पार पडल्या. त्यात चार प्रमुख उमेदवारांमध्ये मध्यममार्गी इमॅन्युएल मॅकरॉन आणि कडव्या उजव्या विचारसरणीच्या मारिन ल पेन यांना आघाडी मिळाली.


मात्र, दोघांपैकी कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यामुळं फ्रान्समधील कायद्यानुसार 7 मे रोजी पुन्हा मतदान होणार असून, त्यात मॅकरॉन विरुद्ध पेन अशी चुरस रंगणार आहे.

राष्ट्राध्यक्षांच्या निवडीसाठी रविवारी मतदान झालं. यावेळी मतदारांकडे एकूण 11 उमेदवारांचा पर्याय होता. यात फ्रेंच टीव्हीनुसार, मॅकरॉन यांना 23.7 टक्के मतं मिळाली. तर ल पेन यांना 21.7 टक्के मतं मिळाली.

मतदानापूर्वी झालेल्या सर्वेक्षणानुसार, मॅकरॉन आणि पेन यांना दि रिपब्लिकन्सचे फ्रांस्वा फियो आणि ला फ्रान्स इनसोमाइसचे जा लुक मेलशो हे कडवी झुंज देतील, असं सांगण्यात आलं होतं.

पण हे अंदाज खोटे ठरवत मॅकरॉन आणि पेन यांच्यात मुख्य लढत होत आहे. पहिल्या फेरीत कुणालाही बहुमत न मिळाल्याने फ्रान्सच्या कायद्यानुसार 7 मे रोजी पुन्हा मतदान होणार आहे.

मारिन ल पेन यांचा अल्प परिचय

व्यवसायाने वकील असलेल्या पेन यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात 2010 पासून केली. यावर्षी त्यांनी रस्त्यावर नमाज पठण करण्याच्या पद्धतीला विरोध करत त्याची तुलना जर्मन वंशियांच्या अतिक्रमणाशी केली.

जानेवारी 2011 मध्ये राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करुन आपल्या वडिलांच्या नॅशनल फ्रंट या पक्षाची धुरा स्वत: च्या खांद्यावर घेतली. यानंतर एक वर्षानंतर म्हणजे 2012 मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना तिसऱ्या स्थानी समाधान मानावं लागलं. पण 2015 मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पेन यांच्या पक्षाला चांगलं यश मिळालं.

मॅकरॉन यांचा अल्प परिचय

39 वर्षीय मॅकरॉन यांनी अद्याप कोणतीही निवडणूक लढली नाही. शिवाय फ्रान्सच्या संसदेत प्रतिनिधित्व केलं नाही. पण त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात सर्वांना थक्क करणारी आहे. 2014 मध्ये त्यांनी फ्रान्सच्या अर्थ मंत्रालयाची सूत्रं हाती घेण्यापूर्वी, ते  माजी राष्ट्राध्यक्ष ओलांद यांचे आर्थिक सल्लागार होतं.